खामगाव – अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर खामगाव शहरात गणेश विसर्जन सोहळ्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी अपेक्षित असल्याने पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. गेल्या दहा दिवसांपासून गणपती बाप्पाच्या आगमनाने शहरात मंगलमय वातावरण होते. आता निरोपाच्या क्षणी मिरवणुकीत शिस्त व सुरक्षितता राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने काटेकोर नियोजन केले आहे.शहरात अतिरिक्त पोलीस अधिकारी, डी. वाय. एस. पी., सहा पोलीस निरीक्षक, ३२ एपीआय, २०० पोलीस कर्मचारी, एसआरपीएफची तुकडी, आरसीबीची दोन पथके आणि १५० होमगार्ड यांची मोठी कुमक नेमली आहे. मिरवणुकीच्या मार्गावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे लक्ष ठेवले जाणार असून, महिला पोलीस कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. वाहतूक व्यवस्थेसाठी स्वतंत्र आराखडा तयार करून मुख्य मार्गावरील वाहतूक वळवली जाणार आहे.यंदा विसर्जनासाठी जनुना तलाव परिसरात नव्याने बांधलेल्या घाटाचा वापर होणार आहे. ध्वनीप्रदूषण नियंत्रणासाठी ठराविक वेळेतच डीजे वा ध्वनिवर्धक वापरण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, शहरातील गणेश मंडळांनीही प्रशासनाला सहकार्याचे आश्वासन दिले आहे.सांस्कृतिक झांकी, ढोल-ताशांच्या गजरात वाजत-गाजत मिरवणूक मार्गक्रमण करणार असून, रात्री उशिरापर्यंत हा सोहळा सुरू राहणार आहे. श्रद्धा, उत्साह आणि सुरक्षेच्या वातावरणात यंदाचे गणेश विसर्जन पार पडणार असल्याचा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.
READ ALSO : https://ajinkyabharat.com/reservation-gr-faddlyacha-allegation-samat-tanav-nirman-hanyachi-bheeti/