शिंदे गटाचा नेता रहस्यमयरित्या गायब; जळगाव राजकारणात खळबळ
जळगाव : शिवसेना (शिंदे गट) चे जळगाव ग्रामीण विधानसभा क्षेत्रप्रमुख आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निकटवर्तीय संजय लोटन पाटील हे रहस्यमयरीत्या बेपत्ता झाले आहेत. त्यांच्या गायब होण्याने जळगाव जिल्ह्यासह राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, पाटील हे काही दिवसांपूर्वी “गावाकडे जातो” असे सांगून घरातून निघाले होते. मात्र ते पुन्हा परतलेच नाहीत. कुटुंबियांनी बराच प्रयत्न केला तरी त्यांच्याशी संपर्क साधता आला नाही. अखेर कुटुंबाने जळगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये हालचाली स्पष्ट
पोलिस तपासात समोर आले की, पाटील हे जळगावातील एका बँकेतून पैसे काढताना दिसले. त्यानंतर ते न्यायालय परिसरात फिरताना दिसले. शेवटचे ते जळगाव रेल्वे स्थानकावर अयोध्या रेल्वेत बसताना आढळले. मात्र त्यानंतर त्यांचा काहीच मागोवा लागलेला नाही. त्यांच्या दोन्ही मोबाईल फोनही बंद असल्याने शोधमोहीम अडचणीत येत आहे.
कोण आहेत संजय लोटन पाटील?
धरणगाव तालुक्यातील दोनगावचे रहिवासी असलेले संजय पाटील हे सध्या धुळे येथे वास्तव्यास होते. जळगाव ग्रामीण मतदारसंघातील ते शिंदे गटाचे प्रमुख असून विधानसभा निवडणुकीदरम्यान एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवली होती. त्यामुळेच त्यांच्या अचानक गायब होण्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.दरम्यान, पोलिसांनी पाटील यांचा कसून शोध सुरू केला असून, ते नेमके कुठे गेले, का गेले याचा तपास सुरू आहे.
READ ALSO : https://ajinkyabharat.com/ganeshotsavat-ghadla-unique-sohla-observer-of-st-moment/