अकोला – महावितरणच्या टीओडी (टाइम ऑफ डे) मीटरमुळे अकोला
परिमंडळातील घरगुती ग्राहकांना मोठा आर्थिक फायदा मिळाला आहे.
जुलै व ऑगस्ट महिन्यातील १ लाख १४ हजार २९६ ग्राहकांना
एकूण १५ लाख २५ हजार रुपयांची सवलत त्यांच्या वीजबिलात मिळाली.
टीओडी मीटरमुळे सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत वापरलेल्या
विजेवर प्रतियुनिट ८० पैसे ते १ रुपयाची सवलत लागू झाली आहे.
महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने पुढील पाच वर्षांसाठी घरगुती
ग्राहकांसाठी हे वीजदर निश्चित केले आहेत. नव्या मीटरमुळे वीज
रीडिंग ऑटोमॅटिक होईल आणि ग्राहकांना मोबाईलवर तासांनिहाय वीज वापर पाहता येईल.
त्यामुळे घरातील वॉशिंग मशीन, गिझर, एअर कंडिशनर व
इतर उपकरणांचा वापर अधिक नियंत्रणाखाली राहील.
टीओडी प्रणाली औद्योगिक ग्राहकांनंतर प्रथमच घरगुती ग्राहकांसाठी लागू झाली आहे.
महावितरणने स्पष्ट केले की टीओडी मीटर मोफत बसवण्यात येत असून,
पोस्टपेड ग्राहकांना अचूक वीजबिल मिळेल. ग्राहकांनी सवलतीचा
लाभ घेण्यासाठी टीओडी मीटर बसविण्यात सहकार्य करावे,
असे आवाहन करण्यात आले आहे.
या नव्या तंत्रज्ञानामुळे घरगुती ग्राहकांचे वीज बिल कमी होईल आणि
घरगृहस्थांना दिवसाच्या वीज वापरावर थेट आर्थिक फायदा होईल.
Read also : https://ajinkyabharat.com/shetkari-hawaladil-picasobat-sheti-sahitya-wahoon-gale/