आज आवतन, उद्या पोळा – पारंपरिक रीत कायम

पारंपरिक

सर्जा-राजाची आज खांदेमळण’; पोळा सणाच्या स्वागतासाठी शेतकरी उत्साहित

वाशिम  – शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा सण पोळा उद्या, शुक्रवार दि. 21 ऑगस्ट रोजी हर्षोल्लासात साजरा केला जाणार आहे.

त्याआधी परंपरेनुसार गुरुवारी (20 ऑगस्ट) शेतकऱ्यांनी आपल्या लाडक्या बैलांची ‘खांदेमळण’ करून सणाची सुरुवात केली.

शेतकऱ्यांनी बैलांना नदी-नाल्यांवर नेऊन स्वच्छ आंघोळ घातली. तूप व हळदीने मालिश करून त्यांना सजविण्यात आले.

तसेच बैलांना ज्वारीचे फळ, वरण-भात, भरडा आदी खास जेवण देऊन “आज आवतन, उद्या जेवण” अशी पारंपरिक रीतदेखील पार पाडली.

पोळ्याचं महत्त्व

श्रावण महिन्यातील पिठोरी अमावस्येला पोळा सण साजरा करण्याची परंपरा आहे. शेतात वर्षभर कष्ट करणाऱ्या सर्जा-राजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी

हा सण विशेष मानला जातो. यानिमित्ताने शेतकरी सर्व कामे बाजूला सारून फक्त बैलांच्या सजावटीत आणि पूजेत रमून जातात.

उत्साहात तयारी

यंदाही शेतकऱ्यांकडे असलेल्या बैलांना खास आंघोळ, सजावट आणि भोजन देऊन सणासाठी सज्ज करण्यात आले आहे.

गावागावात पोळ्याच्या तयारीला वेग आला असून, उद्या बैलांच्या मिरवणुका, पूजा-अर्चा आणि खास कार्यक्रम होणार आहेत.

 पोळ्याच्या निमित्ताने शेतकरी वर्गात उत्साहाचे वातावरण असून, उद्याचा दिवस शेतकऱ्यांसाठी आणि त्यांच्या सर्जा-राजासाठी आनंदाचा ठरणार आहे.

Read also :  https://ajinkyabharat.com/akotamadhyay-encroachment-opposite-moim-chhatrapati-shivaji-maharaj-chowk-complex-moka/