काशीपूरमध्ये 9 वीच्या विद्यार्थ्याकडून शिक्षकावर पिस्तूलातून गोळीबार; शिक्षक गंभीर जखमी
उधमसिंहनगर (काशीपूर) येथील खासगी शाळेत बुधवारी एक धक्कादायक घटना घडली.
9 वीच्या विद्यार्थ्याने आपल्या शिक्षकावर थेट पिस्तूलातून गोळीबार केला. या हल्ल्यात शिक्षक गगनदीप कोहली गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी वर्गात झालेल्या वादातून शिक्षकाने संबंधित विद्यार्थ्याला चुकीच्या उत्तरामुळे थप्पड मारली होती.
त्याचा बदला घेण्यासाठी विद्यार्थ्याने पिस्तूल लंचबॉक्समध्ये लपवून शाळेत आणले. वर्ग संपताच मागून गोळी झाडण्यात आली. गोळी शिक्षकांच्या उजव्या
खांद्याखाली लागून पाठीच्या कण्याजवळ अडकली होती. तीन तासांच्या शस्त्रक्रियेनंतर गोळी काढण्यात आली असून, पुढील 72 तास शिक्षकांसाठी अत्यंत
महत्त्वाचे असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
घटनेनंतर शाळेत खळबळ उडाली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि घटनास्थळावरील पुरावे जप्त केले आहेत. आरोपी विद्यार्थ्याला ताब्यात घेऊन बाल
न्याय मंडळासमोर (Juvenile Justice Board) सादर करण्याची तयारी सुरू आहे. तसेच विद्यार्थ्याच्या वडिलांची चौकशी केली जात असून घरात पिस्तूल
कसे आले, मुलाच्या हातात ते कसे पोहोचले याचा तपास सुरू आहे.
या घटनेमुळे शाळांमधील सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले असून पालक, शिक्षक आणि प्रशासनात मोठी चिंता निर्माण झाली आहे.
Read also : https://ajinkyabharat.com/mahapalikel-corrupt-bing-bing-foot/