बोर्डीतील धर्मे कुटुंबास लाल किल्ल्यावरील ध्वजारोहणासाठी मान
वनौषधी लागवडीतील कार्याची दखल; ग्रामस्थांत आनंद
अकोट – सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या, संत नागास्वामी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या बोर्डी गावातील प्रतिष्ठित शेतकरी व वनौषधी उत्पादक
जगन्नाथ धर्मे आणि पत्नी विमल धर्मे यांना १५ ऑगस्ट रोजी दिल्लीतील लाल किल्ल्यावर होणाऱ्या स्वतंत्रता दिन ध्वजारोहण सोहळ्यास विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहण्याचा मान मिळाला आहे.
हा सन्मान आयुष मंत्रालय, भारत सरकार यांच्यावतीने देण्यात आला असून गावाच्या नावाला देशपातळीवर गौरव मिळाल्याने ग्रामस्थांत आनंदाची लाट आहे.
धर्मे यांनी मागील चार दशकांपासून शेतात १०० हून अधिक प्रजातींच्या वनौषधींची लागवड केली आहे. सफेद मुसळी लागवडीचे जनक म्हणून ते राज्यभर ओळखले जातात.
१९९०-९५ मध्ये त्यांनी न्यायालयीन लढाई जिंकून ही वनौषधी शेतकऱ्यांसाठी खुली केली.
त्यांच्या शेतीला माजी कुलगुरू, वरिष्ठ अधिकाऱ्यांसह परदेशी शास्त्रज्ञांनी भेट दिली असून त्यांनी वनौषधी तेल उत्पादक सहकारी संस्था स्थापन केली आहे.
धर्मे यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना शेतीमित्र पुरस्कार (१९९५), नवोन्मेषी कृषक सन्मान (२०१४), कृषी गौरव पुरस्कार (२०१५), समाजभूषण पुरस्कार (२०१६) अशा मान्यवर सन्मानांनी गौरविण्यात आले आहे.
परसबागेत १०० वनौषधींचा खजिना
धर्मे यांच्या परसबागेत मुरळसेंग, बिब्बा, रीटा, अश्वगंधा, काळी हळद, कोरफड, अशोका, विड्याचे पान, हनुमान फळ, पांढरा पळस
तुळस, गारगोटी, चंद्रज्योती, ३५ प्रकारच्या आंब्याच्या जातींसह विविध फळपिके व वनौषधींचा समृद्ध संग्रह आहे.
READ ALSO :https://ajinkyabharat.com/pick-vima-yojnetun-shetkyanchi-recitation/