अमेरिकेकडून बलुचिस्तान लिबरेशन आर्मी आणि माजिद ब्रिगेड दहशतवादी संघटना घोषित; पाकिस्तानच्या असीम मुनीर यांची इच्छा पूर्ण
वॉशिंग्टन : अमेरिकेने बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (BLA) आणि तिच्या माजिद ब्रिगेड या गटाला अधिकृतपणे परदेशी दहशतवादी
संघटना (FTO) म्हणून घोषित केले आहे. पाकिस्तानचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर यांच्या अमेरिकेच्या
दुसऱ्या दौर्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून, त्याला पाकिस्तानच्या हिताचा मोठा दिलासा मानला जात आहे.
अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांनी सोमवारी (११ ऑगस्ट २०२५ ) जारी केलेल्या निवेदनात सांगितले की, २०१९ पासून BLAने अनेक भीषण हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली आहे.
यात माजिद ब्रिगेडने केलेल्या आत्मघाती हल्ल्यांसह, मार्च २०२५ मधील क्वेट्टाहून पेशावरला जाणाऱ्या जाफर एक्सप्रेस ट्रेन अपहरणाचा समावेश आहे.
या घटनेत ३१ जणांचा मृत्यू झाला आणि ३०० हून अधिक प्रवाशांना ओलीस ठेवण्यात आले होते.
BLA आणि माजिद ब्रिगेडने याआधी कराची विमानतळ, ग्वादर पोर्ट अथॉरिटी कॉम्प्लेक्सजवळील आत्मघाती हल्ले, तसेच कराची ते ग्वादर आणि क्वेट्टा परिसरातील
इतर दहशतवादी कारवायांची जबाबदारीही स्वीकारली आहे. या घटनांनी पाकिस्तानसह संपूर्ण दक्षिण आशियाई प्रदेशाच्या स्थिरतेला धोका निर्माण केल्याचे अमेरिकेने नमूद केले.
FTO दर्जामुळे होणारे परिणाम
या घोषणेनंतर अमेरिकेत BLA आणि माजिद ब्रिगेडची मालमत्ता जप्त करता येईल, तसेच त्यांना आर्थिक किंवा भौतिक सहाय्य देणे हा फौजदारी गुन्हा ठरेल.
याशिवाय, अमेरिका इतर देशांसोबत सहकार्य करून या संघटनांचे नेटवर्क आणि कारवाया थांबवण्याची पावले उचलेल.
असीम मुनीर यांचा गेल्या दीड महिन्यातील हा दुसरा अमेरिका दौरा असून, त्यांच्या भेटीदरम्यान अमेरिका-पाकिस्तान संबंधांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येते.
अमेरिकेचा हा निर्णय त्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानसाठी महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
Read also :https://ajinkyabharat.com/government-land-encroachment/