उद्धव ठाकरेंचा आरोप – भाजपच्या नेत्याने ईव्हीएम हॅकचे प्रात्यक्षिक दाखवले होते
मुंबई : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रासह इतर राज्यांत मतचोरी झाल्याचा
गंभीर आरोप केल्यानंतर, शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही निवडणूक प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना ठाकरे यांनी भाजपाच्याच एका माजी नेत्याने स्वतः ईव्हीएम हॅकचे प्रात्यक्षिक दाखवले होते, असा खळबळजनक दावा केला.
ठाकरेंनी सांगितले की, भाजपसोबत युती असताना हे प्रात्यक्षिक दाखवले गेले होते. “आता ते नेते भाजपात नाहीत.
निवडणुका आल्या की अशी लोकं भेटतात, पण आम्ही अशा पद्धतीने जिंकण्याचा मार्ग कधी स्वीकारला नाही,” असे ठाकरे म्हणाले.
यावेळी त्यांनी खासदार शरद पवारांच्या विधानावरही प्रतिक्रिया दिली. पवार यांनी विधानसभेच्या निवडणुकीत १६० जागा जिंकून देण्याची ऑफर मिळाल्याचा दावा केला होता. त्यावर ठाकरे म्हणाले, “अशी ऑफर आम्हाला देखील मिळाली होती, पण आम्ही ती गांभीर्याने घेतली नाही.”
निवडणूक प्रक्रिया आणि मतदार याद्यांतील कथित घोळांवर सर्वोच्च न्यायालयात जाणार का, असा प्रश्न विचारल्यावर ठाकरे म्हणाले,
“कोर्टात जाऊन काय करायचं? आयोग म्हणतो, डिलिट झालेली नावे कोर्टाला देणं आमचं बंधनकारक नाही. मग निवडणूक आयोग कोर्टाच्या वर आहे का? राष्ट्रपतींपेक्षा वर आहे का?” असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.
राहुल गांधींच्या आरोपानंतर आणि ठाकरे यांच्या खुलाशामुळे, ईव्हीएम हॅकच्या दाव्यांवरून राज्याच्या तसेच देशाच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
आता भाजप या आरोपांना कशा पद्धतीने उत्तर देतो, याकडे लक्ष लागले आहे.