सखाराम बाइंडर – रंगभूमीवरचं वादळी पुनरागमन

सखाराम बाइंडर – रंगभूमीवरचं वादळी पुनरागमन

मराठी रंगभूमीच्या इतिहासात काही नाटके अशी आहेत, जी काळाच्या कसोटीवर टिकून राहतात

आणि पिढ्यान्‌पिढ्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतात. विजय तेंडुलकरांचं ‘सखाराम बाइंडर’ हे

त्यापैकीच एक – १९७२ मध्ये रंगमंचावर आलेलं आणि त्यानंतर वाद, चर्चा, टाळ्या आणि हशा या सगळ्यांचा अनुभव घेत जगलेलं नाटक.

तेंडुलकरांनी या नाटकातून स्त्री–पुरुष संबंधांचं, नैतिकतेच्या सीमारेषांचं आणि समाजाच्या

दांभिकतेचं जे चित्र उभं केलं, ते आजही तितकंच धारदार आहे. त्यामुळेच हे नाटक पुन्हा नव्या पिढीपर्यंत

पोहोचवण्याचा ध्यास दिग्दर्शक अभिजीत झुंजारराव आणि निर्मिती संस्था सुमुख चित्र व आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज यांनी घेतला आहे.

या नव्या सादरीकरणात सखारामच्या भूमिकेत दिसणार आहेत ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे.

पुण्यात त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या नाटकाचं पोस्टर अनावरण करण्यात आलं.

शिंदे सांगतात, “हे नाटक माझ्यासाठी वेगळा अनुभव आहे. आजच्या पिढीने पाहिलं नसेल ते वास्तववादी जग त्यांच्या समोर जिवंत करण्याचा आमचा प्रयत्न असेल.”

दिग्दर्शक झुंजारराव स्पष्ट करतात – “तेंडुलकरांच्या लेखनाला कुठेही धक्का लागू नये, याची विशेष काळजी घेतली आहे.

आजच्या पिढीला त्यांची श्रेष्ठता समजावी, हेच उद्दिष्ट. दिग्दर्शन शैली लोकाभिमुख आहे, पण मूळ आशयाशी प्रामाणिक राहून.”

या नव्या संचात नेहा जोशी, चरण जाधव, अनुष्का बोऱ्हाडे, अभिजीत झुंजारराव यांच्याही भूमिका आहेत.

नेपथ्य सुमीत पाटील, प्रकाशयोजना श्याम चव्हाण, रंगभूषा शरद सावंत, वेशभूषा तृप्ती झुंजारराव,

संगीत आशुतोष वाघमारे यांनी सांभाळले आहे. निर्माते मनोहर जगताप, कार्यकारी निर्माते निखिल जाधव असून सहाय्यक संकेत गुरव आहेत.

‘सखाराम बाइंडर’चं हे पुनरागमन केवळ नाटकाचा पुनर्प्रत्यय नाही, तर समाजाला आरसा दाखवणाऱ्या

एका अभिजात कलाकृतीचा पुनर्जन्म आहे. मंचावरची ही वादळी भेट पुन्हा एकदा रसिकांच्या मनाला हादरवून जाईल, यात शंका नाही.

Read also :https://ajinkyabharat.com/foster-minister-sanjay-rathod-yana-bahini-rakhi-bandhanyasathi-mothi-gardi/