अमरावती येथील भूमी अभिलेख कार्यालयात कार्यरत असलेले उपअधीक्षक अनिल पांडुरंग नेमाडे (वय ५५) आणि नगर
परिक्षण भूमापक चंद्रशेखर पुंडलीकराव गोळे (वय ४३) यांना ५०,००० रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) अमरावती पथकाने ही कारवाई आज दुपारी केली.
प्रकरण काय?
तक्रारदाराचे पुत्र नवजीवन कॉलनी, कॅम्प येथे राहत असून, सध्या परदेशात आहेत.
त्यांच्या वतीने तक्रारदार यांनी मुखत्यारपत्राद्वारे मालमत्तेचा फेरफार करण्यासाठी भूमी अभिलेख कार्यालयात अर्ज केला होता.
याबाबतच्या अपीलमध्ये तक्रारदारांच्या बाजूने निकाल लागला होता.
मात्र सदर फेरफार नोंदवण्यासाठी चंद्रशेखर गोळे यांनी तब्बल १,२५,००० रुपयांची लाचेची मागणी केली होती.
ACB ने दिनांक ३० जुलै रोजी पडताळणी केली असता, तडजोडीनंतर ५०,००० रुपये लाच घेण्याची मागणी झाल्याचे समोर आले.
त्यानुसार आज, दिनांक ३१ जुलै रोजी सापळा कारवाई दरम्यान, गोळे यांनी पंचासमक्ष ही रक्कम स्वीकारली.
दरम्यान, उपअधीक्षक अनिल नेमाडे यांनी देखील गोळेला लाच घेण्यास प्रोत्साहन दिले असल्याचे निष्पन्न झाले आहे.
गुन्हा दाखल आणि पुढील प्रक्रिया
दोघा आरोपींना ताब्यात घेऊन गाडगेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
कारवाई करणारे अधिकारी
या कारवाईसाठी मा. मारुती जगताप, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,
अमरावती आणि श्री. सचिन्द्र शिंदे, अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा लावण्यात आला.
पोलीस उपअधीक्षक श्री. सुनिल किनगे, सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक योगीता ठाकरे व ज्ञानोबा फड यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली.
नागरिकांना आवाहन
लाचखोरीविरोधात सजग राहा, आणि कुणी लाचेची मागणी केल्यास ACB अमरावती कडे त्वरित संपर्क साधा असे आवाहन करण्यात आले आहे.
