बोगस शालार्थ आयडी घोटाळा : आणखी तीन शिक्षकांना अटक, आतापर्यंत १४ आरोपी तुरुंगात

बोगस शालार्थ आयडी घोटाळा : आणखी तीन शिक्षकांना अटक, आतापर्यंत १४ आरोपी तुरुंगात

नागपूर : बोगस शालार्थ आयडी घोटाळ्याचा तपास गतीमान होत असून, गुरुवारी (ता.३१) सायबर पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) आणखी तीन सहाय्यक शिक्षकांना अटक केली. त्यामुळे या प्रकरणातील अटकांची संख्या १४ वर पोहोचली आहे.

अटक झालेल्यांमध्ये सतीश विजय पवार (३४), प्रज्ञा विरेंद्र मुळे (३८) आणि भूमिका सोपान नखाते (३९) यांचा समावेश आहे. हे तिघे अनुक्रमे मानेवाडा येथील विद्याभूषण उच्च प्राथमिक शाळा आणि बोरगाव येथील आदर्श प्राथमिक शाळेत कार्यरत होते.

तपासात उघड झाले की सतीश पवार यांनी ऑगस्ट २०२३ पासून, तर प्रज्ञा मुळे आणि भूमिका नखाते यांनी जून २०२४ पासून बोगस आयडीद्वारे वेतन घेतले. चौकशीसाठी बोलावल्यावर त्यांची कागदपत्रे फसवी असल्याचे समोर आल्यानंतर अटक करण्यात आली.

याआधी बुधवारी दोन शिक्षणाधिकाऱ्यांना अटक झाली होती. त्यांनी मिळून तब्बल ३९८ शिक्षकांचे बोगस प्रस्ताव सादर करून वेतन काढल्याचे समोर आले होते. यापैकी १५४ प्रस्ताव प्राथमिक शिक्षणाधिकारी काळुसे आणि २४४ प्रस्ताव रोहिणी कुंभार यांनी मंजूर केले होते.

एसआयटी आता सर्व ३९८ प्रस्तावांची चौकशी करणार असून, आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.