बुलढाणा / परभणी | ता. १७ एप्रिल २०२५ –
बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर-नांदुरा मार्गावरील काटी फाट्यानजीक देवदर्शनासाठी निघालेल्या
आंध्रप्रदेशच्या भाविकांच्या खासगी बसने उभ्या ट्रकला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात
तीन जणांचा मृत्यू झाला असून ३५ जण जखमी झाले आहेत.
त्यापैकी १० भाविकांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी बुलढाणा येथे हलवण्यात आले आहे.
हा अपघात बुधवारी रात्री ३ वाजण्याच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग
क्र. ६ वरील काटी फाट्यानजीक घडला. बसमधील सर्व प्रवासी आंध्रप्रदेशातील कडप्पा येथील
असून ते नाशिक व शिर्डी येथे देवदर्शनासाठी जात होते. धडकेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला.
घटनेची माहिती मिळताच मलकापूर ग्रामीण पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
दरम्यान, वडनेर भोलजीजवळील फिरोज ढाब्यावरील मुस्लिम बांधवांनी मानवतेचे उदाहरण दाखवत जखमींच्या मदतीसाठी धाव घेतली.
सर्व जखमींना तत्काळ मलकापूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
विशेष म्हणजे, अवघ्या तीन दिवसांपूर्वी याच महामार्गावरील आमसरी फाट्यावर मध्यप्रदेश
परिवहनची बस आणि विटा घेऊन जाणाऱ्या ट्रकची धडक होऊन ३ जण ठार, तर १८ जण जखमी झाले होते.
परभणीतील भीषण अपघातात उपसरपंचाचा मृत्यू, मुलगा गंभीर जखमी
दरम्यान, परभणी जिल्ह्यातील दैठणा-माळसोन्ना मार्गावर आज सकाळी घडलेल्या दुसऱ्या
अपघातात भरधाव टिप्परच्या धडकेत पोरवड गावचे उपसरपंच प्रल्हाद गिराम यांचा जागीच मृत्यू झाला.
त्यांच्यासोबत असलेला लहान मुलगा आणि बहीण गंभीर जखमी झाले
असून त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
मात्र संतप्त गावकऱ्यांनी टिप्परवर दगडफेक करत तीव्र नाराजी व्यक्त केली.
पोलिसांनी प्रसंगावधान राखत जमावाला शांत केले असून सध्या पुढील तपास सुरु आहे.
या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/teaching/