आत वसलेलं गुप्त शहर आणि आढळला इस्रायली सैनिकाचा मृतदेह
इस्रायल–हमास युद्धविरामानंतर सुरू झालेल्या सर्च ऑपरेशनदरम्यान इस्रायलच्या सैन्याला रफाह भागात जमिनीखाली तब्बल 7 किलोमीटर लांब आणि 25 मीटर खोल असलेलं विशाल भुयार सापडलं आहे. हे भुयार साधं बोगद्यासारखं नसून त्यामध्ये 80 हून अधिक खोल्या, शौचालये, वैद्यकीय सुविधा, ऑपरेशन रूम, शस्त्रसाठ्यासाठी गुप्त जागा अशा सोयीसुविधांनी परिपूर्ण असलेलं संपूर्ण लघु शहर वसवण्यात आल्याचं इस्रायली सैन्यानं सांगितलं आहे.
इस्रायल आर्मीने याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत सांगितलं की हे भुयार गाझाच्या त्या भागात आढळलं आहे, जिथे यापूर्वी शरणार्थी कॅम्प, मुलांच्या शाळा आणि हॉस्पिटल होते. या विशाल भूमिगत रचनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. सैन्यानुसार ही रचना अत्यंत मजबूत काँक्रीटची असून आतमध्ये वायुवीजन व्यवस्था, इलेक्ट्रिकल वायरिंग, जनरेटरद्वारे वीजपुरवठा, दोन मजली खोल्या, शस्त्रसाठा, दारुगोळा अशा सुविधा उपलब्ध आहेत.
इस्रायलनं सर्वात मोठा दावा केला आहे की या भुयारामध्ये हमासकडून 2014 च्या युद्धात मृत्यू झालेल्या इस्रायली लेफ्टनंट हदार गोल्डिन यांचा मृतदेह लपवून ठेवण्यात आला होता. गोल्डिन यांच्या मृतदेहाचा मुद्दा अनेक वर्षांपासून इस्रायल–हमास चर्चेचा केंद्रबिंदू होता. युद्धविरामानंतर झालेल्या नव्या करारानुसार हमासनं गोल्डिन यांचे अवशेष इस्रायलला परत दिल्याची माहिती सैन्यानं दिली.
Related News
IDF नुसार, हे भुयार केवळ आश्रयस्थान नसून हमासच्या लष्करी कारवायांसाठी वापरल्या जाणाऱ्या अत्यंत प्रगत सुविधांनी तयार केलेले नेटवर्क आहे. आतमध्ये वैद्यकीय खोली, संप्रेषणासाठी स्वतंत्र विभाग, शस्त्रे लपवण्यासाठी गुप्त कप्पे आणि दहशतवादी हालचालींसाठी सुरक्षित मार्गिका तयार करण्यात आल्या होत्या.
गाझा पट्टीतील संघर्षामुळे हजारो नागरिकांना जीव गमवावा लागला असून अनेक भाग उद्ध्वस्त झाले आहेत. युद्धविरामानंतर इस्रायलचं सर्च ऑपरेशन सुरू असून या भुयाराचा शोध लागणे म्हणजे गाझातील भूमिगत प्रणाली किती मोठी आणि गुंतागुंतीची आहे याचा मोठा पुरावा असल्याचं इस्रायलचं म्हणणं आहे.
इस्रायलनं आगामी काळात या भुयाराचं संपूर्ण जाळं नष्ट करण्याची आणि गाझातील इतर भूमिगत रचना शोधण्याची कारवाई सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे.
