SSC Result 2026 Crisis : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीचा निकाल जाहीर करून चार दिवस उलटले, तरीही राज्यातील शेकडो विद्यार्थ्यांच्या स्क्रीनवर अजूनही निकाल दिसत नसल्याने मोठा गोंधळ उडाला आहे. निकालाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना बोर्डाकडून स्पष्ट उत्तर मिळत नसल्याने मानसिक तणाव वाढला आहे. अकरावी प्रवेश प्रक्रिया जवळ आली असताना हा तांत्रिक गोंधळ विद्यार्थ्यांच्या भविष्यावर परिणाम करणारा ठरत आहे.
महाराष्ट्र बोर्डाने 8 मे रोजी SSC Result 2026 ऑनलाईन जाहीर केला. लाखो विद्यार्थ्यांनी आनंद साजरा केला, पुढील शिक्षणाच्या तयारीलाही सुरुवात झाली. मात्र, या आनंदात अनेक विद्यार्थ्यांच्या वाट्याला चिंता, संभ्रम आणि निराशा आली. अनेक विद्यार्थ्यांच्या निकालाच्या जागी वेबसाइटवर कोणतीही माहिती न दिसता “Result Withheld” किंवा रिकामी स्क्रीन दिसत असल्याने विद्यार्थी अक्षरशः हादरले आहेत.
निकाल लागला, पण स्क्रीनवर काहीच नाही!
पुणे विभागीय मंडळात तब्बल 117 विद्यार्थ्यांचे निकाल तांत्रिक कारणामुळे किंवा प्रशासकीय त्रुटींमुळे राखून ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे या विद्यार्थ्यांनी कोणताही गैरप्रकार केलेला नसतानाही त्यांना या समस्येचा सामना करावा लागत आहे.
Related News
निकाल जाहीर झाल्यानंतर अनेक विद्यार्थी आणि पालकांनी वेबसाइटवर पुन्हा पुन्हा लॉगिन केले. काहींनी सायबर कॅफे गाठले, तर काहींनी शाळांमध्ये चौकशी केली. मात्र, कुठेही ठोस उत्तर मिळाले नाही. बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावरही याबाबत स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही.
व्हॉट्सॲपवरून गुण पाठवण्याची वेळ
या गोंधळामुळे बोर्डाच्या कर्मचाऱ्यांनाही मोठी धावपळ करावी लागली. अनेक विद्यार्थ्यांचे गुण अधिकृत वेबसाईटवर दिसत नसल्याने बोर्ड कर्मचाऱ्यांनी थेट व्हॉट्सॲपवरून निकाल पाठवण्यास सुरुवात केली. निकालाच्या दिवशी रात्री उशिरापर्यंत कर्मचारी कार्यालयात बसून विद्यार्थ्यांपर्यंत माहिती पोहोचवत होते.
मात्र, ही तात्पुरती व्यवस्था ठरली. अनेक विद्यार्थ्यांना अजूनही अधिकृत मार्कशीट किंवा वेबसाइटवरील निकाल उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम अधिक वाढला आहे.
“मुलीने जेवणच सोडलं”; पालकांचा संताप
या प्रकारामुळे विद्यार्थ्यांवर मानसिक परिणाम होत असल्याचे समोर येत आहे. भोसरीतील संदीप थोरात यांनी सांगितले की, त्यांच्या मुलीचा निकाल अजूनही दिसत नाही. नातेवाईक आणि मित्र सतत निकालाबद्दल विचारत असल्याने मुलगी प्रचंड तणावाखाली आहे.
मुंबई विभागातील आकांक्षा नाईक हिची परिस्थितीही वेगळी नाही. निकाल न लागल्यामुळे ती मानसिक धक्क्यात गेली असून तिने जेवणही सोडल्याचे तिच्या कुटुंबीयांनी सांगितले. “मुलीने वर्षभर मेहनत केली, पण आता निकालच दिसत नसल्याने ती खचली आहे,” अशी भावना तिच्या वडिलांनी व्यक्त केली.
जेजुरीच्या श्रेयाची धावपळ सुरूच
पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथील जिजामाता इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थिनी श्रेया वाईकर हिचाही निकाल अद्याप प्रलंबित आहे. बोर्ड कार्यालयात अनेक वेळा फेऱ्या मारूनही समाधानकारक उत्तर मिळत नसल्याचे तिच्या पालकांनी सांगितले.
सामान्यतः कॉपी केस, गैरप्रकार किंवा दस्तऐवजातील त्रुटींमुळे निकाल राखून ठेवला जातो. मात्र, कोणतीही चूक नसताना विद्यार्थ्यांना वेठीस धरण्याचा प्रकार का घडतो आहे, असा संतप्त सवाल पालक उपस्थित करत आहेत.
अकरावी प्रवेशावर परिणाम होण्याची भीती
या संपूर्ण प्रकारामुळे विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक प्रक्रियेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अकरावी प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून, अनेक कॉलेजेसमध्ये गुणवत्ता यादी तयार होण्यास सुरुवात होणार आहे. अशा परिस्थितीत निकालच उपलब्ध नसल्याने हे विद्यार्थी स्पर्धेत मागे पडतील, अशी भीती पालक व्यक्त करत आहेत.
विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज भरताना मार्कशीट आवश्यक असते. मात्र, निकाल न मिळाल्याने अनेक जण प्रवेश प्रक्रियेपासून दूर राहण्याच्या भीतीत आहेत.
बोर्डाचे स्पष्टीकरण अद्याप अस्पष्ट
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने या संपूर्ण प्रकरणावर सोमवारी स्पष्टीकरण देण्याचे आश्वासन दिले आहे. तांत्रिक अडचणी, डेटा अपडेट किंवा प्रशासकीय कारणांमुळे ही समस्या निर्माण झाल्याचे प्राथमिक स्तरावर सांगितले जात असले तरी अधिकृत आणि स्पष्ट माहिती अजूनही देण्यात आलेली नाही.
पालक आणि विद्यार्थ्यांची मागणी आहे की, बोर्डाने तातडीने सर्व प्रलंबित निकाल जाहीर करावेत आणि विद्यार्थ्यांच्या मानसिक तणावाची दखल घ्यावी. कारण निकालाच्या प्रतीक्षेत असलेले हे चार दिवस अनेक विद्यार्थ्यांसाठी अत्यंत वेदनादायी ठरत आहेत.
विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न
दहावीचा निकाल हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा मानला जातो. याच निकालावर पुढील शिक्षणाची दिशा ठरते. अशा वेळी तांत्रिक त्रुटी आणि प्रशासकीय गोंधळामुळे विद्यार्थ्यांचे मानसिक संतुलन बिघडत असल्याची चिंता शिक्षण तज्ज्ञांनीही व्यक्त केली आहे.
तज्ज्ञांच्या मते, बोर्डाने डिजिटल प्रणाली अधिक सक्षम करण्याची गरज आहे. लाखो विद्यार्थ्यांचा निकाल ऑनलाईन जाहीर करताना तांत्रिक चाचण्या अधिक काटेकोरपणे होणे आवश्यक आहे. अन्यथा प्रत्येक वर्षी विद्यार्थ्यांना अशाच त्रासाला सामोरे जावे लागू शकते.
