रमजान ईदपूर्वी कब्रस्तान रस्ता आणि स्वच्छतेचा प्रश्न सोडवा – नागरिकांची मागणी

रमजान ईदपूर्वी कब्रस्तान रस्ता आणि स्वच्छतेचा प्रश्न सोडवा – नागरिकांची मागणी

तेल्हारा (दि.) – शहरातील कब्रस्तानमधील विविध समस्या रमजान ईदपूर्वी सोडवण्यात याव्यात, अशी मागणी नागरिकांनी तेल्हारा पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

कब्रस्तानकडे जाणारा रस्ता अत्यंत दयनीय अवस्थेत असून, नाल्यातील चिखल आणि खोल वाटांमुळे मुस्लिम बांधवांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

अंत्यविधी व धार्मिक विधींसाठी जाताना मोठी कसरत करावी लागत असून, ट्रॅक्टरचा वापर करावा लागतो. तसेच, कब्रस्तानमध्ये स्वच्छतेचा अभाव असून, मोठ्या प्रमाणात गवत वाढलेले आहे.

Related News

 

पालिकेने यापूर्वी पिण्याच्या पाण्यासाठी टाकी बसवण्याचा निर्णय घेतला होता, मात्र तो अद्याप पूर्ण झालेला नाही. त्यामुळे कब्रस्तानमध्ये पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे.

याशिवाय, कब्रस्तानच्या मुख्य प्रवेशद्वाराव्यतिरिक्त उर्वरित गेट बंद करण्यात यावेत, अशीही मागणी करण्यात आली आहे.

हा रस्ता परिसरातील शेतकऱ्यांसाठीही महत्त्वाचा असून, शेतमाल वाहतूक करणे कठीण झाले आहे.

मागील दोन वर्षांत रस्ता सुधारण्याची वारंवार मागणी करण्यात आली, मात्र अद्याप त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही.

 

या मागण्यांसाठी रस्ता विकास संघर्ष समिती, मुस्लिम आणि शेतकरी बांधवांनी पालिका मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे.

निवेदनावर रामभाऊ फाटकर, मतीन शाह, मो. शारिक, शारूख पठाण, शेख रहेमान, शेख सलीम, शेख फरीद, सय्यद निसार आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

नागरिकांनी रमजान ईदपूर्वी या समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

 

 

Related News