युवक काँग्रेसकडून सार्वजनिक बांधकाम व रेल्वे विभागाकडे लेखी मागणी

राजकमल उड्डाण पुलाचे काम का ठप्प ?

अमरावती – शहरातील वाहतूक व्यवस्थेचा कणा मानल्या जाणाऱ्या राजकमल उड्डाण पुलाच्या रखडलेल्या कामाबाबत अमरावती शहर युवक काँग्रेसने तीव्र भूमिका घेतली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग व रेल्वे विभागाने उड्डाण पुलाच्या कामासंदर्भात आतापर्यंत काय कारवाई केली आहे, याचा तातडीने सार्वजनिक खुलासा करावा, अशी मागणी युवक काँग्रेसने लेखी निवेदनाद्वारे केली.युवक काँग्रेसचे अध्यक्ष वैभव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, राजकमल उड्डाण पूल पूर्णपणे बंद केल्यामुळे शहराची वाहतूक व्यवस्था पूर्णतः कोलमडली आहे. गणेशोत्सव संपल्यानंतर आता नवरात्र व अंबादेवी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे.इर्विन चौक, राजकमल चौक, राजापेठ चौक, कॉटन मार्केट, रुख्मिणी नगर, एस.टी. स्टँड रोड, गांधी चौक, कंवर नगर या भागांत गेल्या ३० दिवसांपासून सतत जामची परिस्थिती आहे. नागरिकांना दररोज १-२ तास वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. परंतु शासन, पालकमंत्री आणि संबंधित विभागांनी अद्याप कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याचा आरोप युवक काँग्रेसने केला आहे.राजकमल पुलाचे बांधकाम कधी सुरू होणार, निधी कसा उपलब्ध होणार, कामाची डेडलाईन काय असेल, यासंदर्भात कोणताही अधिकृत खुलासा करण्यात आलेला नाही. उलटपक्षी, पूल धोकादायक स्थितीत असल्याचे अहवाल असतानाही त्यावर रंगरंगोटी, लाईटिंग, सिडीकरण यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आल्याचा मुद्दाही निवेदनात मांडण्यात आला आहे.सार्वजनिक बांधकाम विभागातील संबंधित अभियंत्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून लाचलुचपत विभागामार्फत चौकशी करावी, अशी मागणीही युवक काँग्रेसने केली आहे.

read also : https://ajinkyabharat.com/wadegaon-this-adhawa-meeting/