जागतिक पातळीवर भीतीचे वातावरण!
तिसऱ्या महायुद्धाच्या शक्यतेची चर्चेला पुन्हा एकदा उधाण आले आहे. कारण रशियाने पहिल्यांदाच जपानजवळ अणु बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी तैनात केली आहे. या हालचालीमुळे जपान, अमेरिका आणि जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.युक्रेन-रशिया युद्धामुळे आधीच तणाव वाढला असताना, आता रशियाने घेतलेल्या या पावलामुळे परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.
जपानजवळ रशियन अणु पाणबुडी
24 सप्टेंबर रोजी जपानच्या किनाऱ्यावर रशियन नौदलाची अणु बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी दिसल्याचे जपानी अधिकाऱ्यांनी पुष्टी केली आहे. ही पाणबुडी क्रूझर आरएफएस वर्याग आणि बचाव टग फोटी क्रिलोव्हसोबत ला पेरूस सामुद्रधुनीतून प्रवास करताना दिसली.
ही सामुद्रधुनी जपानच्या होक्काइडो बेट व रशियाच्या सखालिन बेटाच्या दरम्यान आहे. पाणबुडी जपानच्या सागरी सीमांच्या बाहेर होती, तरीही जपानने या घटनेला गंभीरतेने घेतले असून सागरी दक्षता वाढवली आहे.
अणुशक्तीत दुसऱ्या क्रमांकावर रशिया
अमेरिकन गुप्तचर अहवालानुसार, रशियाकडे तब्बल 5,460 अणु शस्त्रे असून, त्यापैकी अंदाजे 1,718 शस्त्रे सध्या तैनात आहेत. ही शस्त्रे जमीन, समुद्र आणि हवाई मार्गाने हल्ला करण्यास सक्षम आहेत.सोव्हिएत काळातील शस्त्रांच्या जागी रशियाने सरमत (RS-28), यार्स आयसीबीएम, तसेच बोरी-क्लास पाणबुडीवर आधारित आधुनिक क्षेपणास्त्र प्रणाली तैनात केली आहे.
रशिया-जपान वादाचा धग
कुरिल बेटांवरील रशिया-जपान वाद दीर्घकाळापासून सुरू आहे. युक्रेन युद्धानंतर जपानने रशियावर अतिरिक्त निर्बंध लादले होते. त्यानंतर रशियाकडून कारवाईची धमकीही देण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर रशियाच्या ताज्या हालचालींमुळे या वादाला नव्या धगीची शक्यता आहे.
जगभरात भीतीचे वातावरण
युक्रेन युद्ध, चीन-तैवान तणाव आणि आता रशियाच्या हालचालींमुळे जगभरात तिसऱ्या महायुद्धाच्या भीतीचे सावट घोंघावत आहे. अमेरिका आणि युरोपियन देश आधीच रशियावर दबाव आणत आहेत. मात्र युद्ध थांबण्याऐवजी आणखी भडकण्याचे संकेत मिळत आहेत. पुढील काही दिवसांत रशिया, जपान आणि अमेरिका या देशांच्या हालचालींवर जगभराची नजर असणार आहे.
read also : https://ajinkyabharat.com/putin-yancha-trump-yana-sarvat-motha/
