महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, अकोला आणि आरोळी सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण भागातील महिलांसाठी निःशुल्क व्यवसाय प्रशिक्षण देण्यात आले होते. या प्रशिक्षणाचा समारोप व प्रमाणपत्र वितरण समारंभ मंगळवारी दुपारी वणी रंभापूर येथे संपन्न झाला. या कार्यक्रमात महिला सक्षमीकरण आणि जनजागृती या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, आत्मविश्वास वाढवावा आणि अन्याय-अत्याचाराविरोधात उभे राहण्याची ताकद मिळावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. महिला व बाल विकास अधिकारी गिरीष पुसदकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “महिला सक्षम झाल्यास समाजाची प्रगती आपोआप होते. महिलांसाठी विविध शासकीय योजना जसे की बाल संगोपन, संरक्षण योजना, आत्मनिर्भरता प्रशिक्षण या सर्वांचा लाभ घ्यावा.” कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान गिरीष पुसदकर यांनी भूषवले. प्रमुख पाहुणे म्हणून बाल संरक्षण अधिकारी सुनील लाडुलकर, सखी वन स्टॉप सेंटरच्या एड. मनीषा भोरे, ग्रामपंचायत सदस्य अनुराधा आठवले आणि सुखाय फाउंडेशनच्या शुभांगी लाहुडकर तायडे उपस्थित होत्या. या कार्यक्रमात महिलांना खालील विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले: बालकांबाबतचे कायदे आणि बालविवाह प्रतिबंध (सुनील लाडुलकर), अत्याचार प्रतिबंध, उपचार व समुपदेशन सुविधा (एड. मनीषा भोरे), मैत्री प्रकल्पाची माहिती (शुभांगी लाहुडकर तायडे),कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक आरोळी सामाजिक संस्थेचे समाधान वानखडे यांनी केले.आभार प्रदर्शन रोशन चोरे यांनी मानले.या प्रसंगी एकल विधवा ताई, गरजू महिला आणि मुलींना व्यवसाय प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल प्रमाणपत्रे गिरीश पुसदकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.कार्यक्रमाच्या शेवटी आरोळी सामाजिक संस्थेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सीमा वानखडे आणि सखी वन स्टॉप सेंटरच्या प्रिया इंगळे यांनी परिश्रम घेतले.
read also:https://ajinkyabharat.com/suryakumar-yadavcha-motha-decision/
