वाशिमच्या रिसोड तालुक्यात चिखली गावात चोरीचा धुमाकूळ

चोरीचा

वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील चिखली गावात चोरट्यांनी एकाच रात्री अक्षरशः धुमाकूळ घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सलग चार ते पाच घरांवर घरफोडी करत चोरट्यांनी रोख रक्कम व सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला असून, या चोरीत लाखोंचा ऐवज लंपास झाल्याने संपूर्ण गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, चिखली गावातील भिकाजी पुंड, कैलास घाटोळ, भगवान घाटोळ, पंडित घाटोळ, रवी अंभोरे आणि न्यानेश्वर लाड यांच्या घरांना चोरट्यांनी लक्ष्य केले. रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घरांचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील कपाटे, पेट्या उघडून मौल्यवान वस्तूंची चोरी करण्यात आली. या घरांमधून अंदाजे तीन लाख रुपयांची रोख रक्कम आणि सुमारे तीन तोळे सोन्याचे दागिने चोरीस गेल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

सकाळी घरमालक उठल्यानंतर घरातील सामान अस्ताव्यस्त अवस्थेत दिसून आल्याने चोरीचा प्रकार उघडकीस आला. घरफोडी झाल्याचे लक्षात येताच संबंधित नागरिकांनी शेजाऱ्यांना माहिती दिली. काही वेळातच ही बातमी संपूर्ण गावात पसरली आणि गावकऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. एकाच रात्री अनेक घरांमध्ये चोरी झाल्याने गावातील नागरिक भयभीत झाले असून, महिलांमध्ये आणि वृद्धांमध्ये विशेषतः असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

Related News

घटनेची माहिती मिळताच रिसोड पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून तपासाला सुरुवात केली आहे. चोरट्यांचा माग काढण्यासाठी डॉग स्क्वॉडच्या सहाय्याने परिसरात शोधमोहीम राबवण्यात येत आहे. तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू असून, संशयित व्यक्तींच्या हालचालींचा तपास केला जात आहे.

सलग झालेल्या घरफोड्यांमुळे चिखली गावातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. “रात्रीच्या वेळी गावात पुरेशी पोलीस गस्त नसल्यामुळे अशा घटना घडत आहेत,” अशी संतप्त प्रतिक्रिया काही ग्रामस्थांनी व्यक्त केली. चोरट्यांना लवकरात लवकर अटक करण्यात यावी, रात्रीची पोलीस गस्त वाढवावी आणि गावात नियमित पेट्रोलिंग सुरू करावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, पोलिस प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. रात्रीच्या वेळी घरांची योग्य ती खबरदारी घ्यावी, मौल्यवान वस्तू सुरक्षित ठिकाणी ठेवाव्यात आणि कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

read also :  https://ajinkyabharat.com/crime-registered-in-case-of-casteist-shivigal-in-borgaon-manju/

Related News