वानखेडेवर गाड्या लावा; पावसात भिजल्यावर कपडे बदला… मनोज जरांगे पाटलांची आंदोलकांना नवी सूचना
मुंबई –मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानावर सुरू
असलेल्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस असून,
आंदोलकांचा उत्साह कमी झालेला नाही.
मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हजारो मराठा बांधव ठिय्या मांडून आरक्षणाच्या मागणीवर ठाम आहेत.
पत्रकार परिषदेत बोलताना जरांगे पाटलांनी आंदोलकांना धीर देत नवीन सूचना दिल्या.
“मुंबईत आलेले बांधव वानखेडे स्टेडियमवर गाड्या लावा.
पावसात भिजल्यावर तिथे कपडे बदलता येतील. झोप व जेवणाची सोयही होईल.
समाजाची मान खाली जाऊ देऊ नका, एकत्र राहा,” असे आवाहन त्यांनी केले.
सरकारवर सडकून टीका करताना जरांगे म्हणाले,
“राजकारणी, आमदार, मंत्री हे नासके आहेत. दोन वर्षांपासून सांगत आहोत,
तरी आरक्षणाबाबत निर्णय घेतला नाही.
आम्हाला म्हशी भादरायला ठेवलं होतं का? हे लोकं नीच आहेत.
आरक्षण आम्ही ओबीसी कोट्यातूनच मिळवणार, कोणतीही माघार घेणार नाही.”
आरक्षण वैधतेच्या मुद्द्यावर त्यांनी सरकारला सवाल केला. “जर आमची मागणी अवैध असेल,
तर आतापर्यंत ओबीसी कोट्यात समाविष्ट केलेल्या १८० जातींची मागणीही अवैध ठरली पाहिजे.
मंडल आयोगाने दिलेले १४ टक्के आरक्षण आता ३० टक्के झाले आहे.
मग ते वाढलेले आरक्षण वैध कसे? ५० वर्षे सर्वेक्षण न करताच जातींना आरक्षण मिळाले,
मग ते कायदेशीर कसे?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
“मी मेल्यावरच उपोषण संपवणार,” असा निर्धार व्यक्त करत जरांगेंनी समाजबांधवांना संयम,
शांतता आणि ऐक्य राखण्याचे आवाहन केले.
Read also : https://ajinkyabharat.com/akolidya-shri-riddhi-siddhi-mandalacha-daha-avatrancha-dekhawa-rachwa-center/