विठ्ठलवाडी शिवारात खून; किरकोळ वादातून ७७ वर्षीय वृद्धाचा मृत्यू आरोपी अवघ्या एका तासात पोलिसांच्या ताब्यात

खून

डोणगाव : डोणगावपासून जवळ असलेल्या ग्राम विठ्ठलवाडी शिवारात किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून ७७ वर्षीय वृद्धाचा खून झाल्याची धक्कादायक घटना १४ डिसेंबर रोजी सायंकाळी सुमारे ६.३० वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणात डोणगाव पोलिसांनी अतिशय जलद कारवाई करत अवघ्या एका तासात आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मखराम चतरु राठोड (वय ७७, रा. विठ्ठलवाडी) हे धरणाच्या ओढ्यालगत असलेल्या त्यांच्या शेतात गेले होते. बराच वेळ झाल्यानंतर ते परत न आल्याने त्यांचा नातू शेतात पाहण्यासाठी गेला. त्यावेळी मखराम राठोड हे जमिनीवर पडलेल्या अवस्थेत दिसून आले. ही बाब तात्काळ डोणगाव पोलीस ठाण्याला कळविण्यात आली.

माहिती मिळताच डोणगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार अमरनाथ नागरे, पी.एस.आय. पवार, पोलीस कॉन्स्टेबल पवन गाभणे व चालक चव्हाण यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पाहणीदरम्यान मखराम राठोड यांच्या डोक्यावर गंभीर मार लागल्याचे आढळून आल्याने हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय पोलिसांना आला.

Related News

यानंतर ठाणेदार अमरनाथ नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरात शोधमोहीम राबविण्यात आली. यावेळी शेजारील शेतात राखणदार म्हणून काम करणारा देविदास चंद्रभान जामकर (वय ५५, रा. सोनोना, ता. पातूर, जि. अकोला) हा शेतात आढळून न आल्याने पोलिसांचा संशय अधिक बळावला. पुढील तपासादरम्यान पोलिसांनी परिसरातील शेतांमध्ये झडती घेतली असता आरोपी देविदास जामकर हा एका शेतात झुडपाआड लपून बसलेला आढळून आला.

त्याला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणल्यानंतर कसून चौकशी करण्यात आली. चौकशीत आरोपीने शेतात किरकोळ कारणावरून वाद झाला असून त्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी रागाच्या भरात आपण काठीने मखराम राठोड यांच्या डोक्यावर वार केल्याचे त्याने कबूल केले. त्या मारामुळे मखराम राठोड यांचा जागीच मृत्यू झाल्याची कबुली आरोपीने दिली.

डोणगाव पोलिसांनी संशयाच्या आधारावर तात्काळ कारवाई करत अवघ्या एका तासात आरोपीला ताब्यात घेऊन अटक केली. ही घटना १५ डिसेंबर रोजी रात्रभर केलेल्या तपासातून उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार अमरनाथ नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

या घटनेमुळे विठ्ठलवाडी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून किरकोळ वादातून टोकाची पावले उचलली जात असल्याबद्दल ग्रामस्थांतून हळहळ व्यक्त होत आहे.

read also : https://ajinkyabharat.com/due-to-non-attendance-of-gram-sevak-in-raipur-gram-panchayat-work-stopped/

Related News