भारतीय कुस्ती महासंघाने विनेश फोगटला राष्ट्रीय मानांकन स्पर्धेत प्रवेश नाकारत 15 पानी नोटीस बजावली; डोपिंग नियम, वजन व शिस्तभंगाचे गंभीर आरोप
मुंबई : भारतीय महिला कुस्तीपटू Vinesh Phogat पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. पॅरिस ऑलिम्पिकनंतर पुनरागमनाची तयारी करणाऱ्या विनेशला मोठा धक्का बसला असून भारतीय कुस्ती महासंघाने (WFI) तिला गोंडा येथे सुरू झालेल्या राष्ट्रीय मानांकन कुस्ती स्पर्धेत सहभागी होण्यास मज्जाव केला आहे. विशेष म्हणजे, खेळण्याआधीच विनेश “चीतपट” झाल्याची चर्चा आता क्रीडा वर्तुळात रंगू लागली आहे.
भारतीय कुस्ती महासंघ आणि विनेश फोगट यांच्यातील संघर्ष मागील काही महिन्यांपासून वाढत चालला आहे. आता महासंघाने थेट 15 पानी कारणे दाखवा नोटीस बजावत तिच्यावर शिस्तभंग, उत्तेजक प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन आणि भारतीय कुस्तीची प्रतिमा मलिन केल्याचे गंभीर आरोप केले आहेत.
Related News
नेमकं काय आहे प्रकरण?
महासंघाच्या माहितीनुसार, जागतिक कुस्ती महासंघाच्या (UWW) नियमांनुसार एखादा खेळाडू निवृत्तीनंतर पुनरागमन करत असेल, तर त्याने कमीत कमी सहा महिने आधी अधिकृत नोटीस देणे बंधनकारक असते. मात्र, विनेशने डिसेंबर 2025 मध्ये पुनरागमनाचा निर्णय घेतला, पण आवश्यक प्रक्रिया वेळेत पूर्ण केली नाही.त्यामुळे तिला जून 2026 अखेरपर्यंत कोणत्याही अधिकृत देशांतर्गत स्पर्धेत सहभागी होता येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.महासंघाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, “जागतिक उत्तेजक प्रतिबंधक नियमांमध्ये कोणतीही तडजोड होणार नाही. विनेशने स्वतः पात्र असल्याचे सिद्ध करणे आवश्यक आहे.”
15 पानी नोटीसमध्ये कोणते आरोप?
महासंघाने विनेशविरोधात अनेक गंभीर मुद्दे उपस्थित केले आहेत. त्यामध्ये खालील बाबींचा समावेश आहे:
- पॅरिस ऑलिम्पिकदरम्यान वजन नियंत्रणात अपयश
- उत्तेजक प्रतिबंधक नियमातील “Whereabouts Rule” चे उल्लंघन
- निवृत्तीनंतर पुनरागमनासाठी आवश्यक सहा महिन्यांची नोटीस न देणे
- राष्ट्रीय निवड चाचणीत नियमबाह्य सहभाग
- भारतीय आणि जागतिक कुस्ती महासंघाच्या शिस्तभंग नियमांचे उल्लंघन
‘100 ग्रॅम’मुळे हुकले भारताचे पदक?
पॅरिस ऑलिम्पिकमधील प्रसंग अजूनही भारतीय चाहत्यांच्या लक्षात आहे. अंतिम सामन्यापूर्वीच्या वजन तपासणीत विनेशचे वजन निर्धारित मर्यादेपेक्षा 100 ग्रॅम जास्त आढळले होते. त्यामुळे तिला अंतिम फेरीतून अपात्र ठरवण्यात आले.महासंघाच्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, “स्पर्धेपूर्वी विनेशचे वजन 49.9 किलो होते. मात्र अंतिम सामन्याच्या दिवशी आवश्यक वजन नियंत्रण करण्यात ती अपयशी ठरली. त्यामुळे भारताचे निश्चित मानले जाणारे पदक हुकले.”हा मुद्दा आता पुन्हा चर्चेत आला असून सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटत आहेत.
डोपिंग नियमांवरून वाढला वाद
14 डिसेंबर 2024 रोजी विनेशने जागतिक कुस्ती महासंघाच्या उत्तेजक प्रतिबंधक विभागाला ई-मेल पाठवून आपण ऑगस्ट 2025 पर्यंत डोपिंग चाचणीच्या कक्षेत नसणार असल्याचे स्पष्ट केले होते.यानंतर 12 डिसेंबर 2025 रोजी तिने क्रीडा मंत्रालय, साई आणि भारतीय कुस्ती महासंघाला ई-मेल करून लॉस एंजलिस ऑलिम्पिकसाठी तयारी सुरू करणार असल्याचे सांगितले. मात्र, या मेलमध्ये आवश्यक सहा महिन्यांच्या नोटीसचा उल्लेख नव्हता.याच दरम्यान ती दोन वेळा डोपिंग चाचणीसाठी अनुपलब्ध आढळली. 25 सप्टेंबर 2024 आणि नंतर डिसेंबर 2025 मध्ये तिची अनुपस्थिती नोंदवण्यात आली.
इतर खेळाडूंची उदाहरणे देत महासंघाचा इशारा
महासंघाने आपल्या नोटीसमध्ये इतर कुस्तीपटूंची उदाहरणेही दिली आहेत. अमन सेहरावत याचे वजन 1.7 किलोने जास्त आढळल्याने त्याच्यावर एका वर्षाची बंदी घालण्यात आली होती. तर नेहा सांगवानवर दोन वर्षांची कारवाई करण्यात आली होती.यामुळे विनेशच्या बाबतीतही महासंघ कठोर भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पुनरागमनावर मोठे प्रश्नचिन्ह
पॅरिस ऑलिम्पिकनंतर काही काळ विनेश फोगट सक्रिय स्पर्धांपासून दूर होती. तिने मातृत्वानंतर पुनरागमनाची घोषणा केली होती. लॉस एंजलिस ऑलिम्पिक 2028 लक्षात घेऊन ती सरावाला लागल्याची माहिती समोर आली होती.मात्र, आता राष्ट्रीय स्तरावरच प्रवेश नाकारल्याने तिच्या पुनरागमनावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
कुस्तीविश्वात खळबळ
भारतीय कुस्ती महासंघाच्या या निर्णयामुळे देशातील कुस्तीविश्वात मोठी खळबळ उडाली आहे. काही माजी खेळाडूंनी महासंघाच्या निर्णयाला योग्य म्हटले आहे, तर काहींनी विनेशला नियम समजून घेण्यासाठी अधिक संधी द्यायला हवी होती, असे मत व्यक्त केले आहे.सोशल मीडियावर चाहत्यांमध्येही मतभेद दिसत आहेत. काही जण महासंघावर टीका करत आहेत, तर काहींनी नियम सर्वांसाठी समान असल्याचे सांगत निर्णयाचे समर्थन केले आहे.
