बार्शीटाकळी तालुक्यात “सेवा पंधरवडा” – शेतरस्त्यांचे सीमांकन व अंमलबजावणी
बार्शीटाकळी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस (१७ सप्टेंबर) ते महात्मा गांधी जयंती (२ ऑक्टोबर) या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज महारास्व अभियानांतर्गत बार्शीटाकळी तालुक्यात “सेवा पंधरवडा” साजरा केला जाणार आहे. महसूल व वनविभागाच्या शासन निर्णयान्वये जिल्हाधिकारी वर्षा मीना आणि उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवला जाणार आहे.
काय होणार या पंधरवड्यात?
१७ ते २२ सप्टेंबर या कालावधीत पांदण रस्ते, गाडीमार्ग, पायीमार्ग व शेतावर जाणारे मार्ग यांचे सीमांकन करण्यात येईल.
२९ ऑगस्ट २०२५ च्या शासन निर्णयानुसार प्रत्येक रस्त्याला विशिष्ट क्रमांक (कोड) देण्यात येणार आहे.
तालुक्यातील सर्व १६० गावांमध्ये शिवार फेरी घेऊन गाव नकाशावर नसलेले पण प्रत्यक्ष वापरात असलेले रस्ते नोंदवले जातील.
प्राथमिक यादी १५ सप्टेंबरच्या ग्रामसभेत ग्रामस्थांसमोर मांडली जाईल. त्यानंतर अंतिम यादी तयार करून भूमी अभिलेख विभागामार्फत सीमांकन होईल.
अतिक्रमण आढळल्यास त्याची तत्काळ नोंद घेऊन ते निष्कासित करण्यात येईल.
प्रत्येक रस्त्याची नोंद सातबारा, वाजिबउल अर्ज, गाव नमुना क्र. १(फ) मध्ये करण्यात येईल.
तहसीलदारांचे आवाहन
“तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी शिवार फेरीत सहभागी होऊन आपल्या शेताशी संबंधित पांदण व रस्त्यांची पाहणी करून नोंदी करून घ्याव्यात. अतिक्रमण झालेल्या रस्त्यांचे सीमांकन करून त्यांना विशिष्ट क्रमांक द्यावेत,” असे आवाहन तहसीलदार राजेश वझीरे यांनी केले आहे. या सेवा पंधरवड्यातून शेतकऱ्यांना हक्काचे रस्ते कायदेशीर मान्यता मिळणार असून, गाव नकाशे व नोंदी व्यवस्थित करण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे.
read also : https://ajinkyabharat.com/jana-sanghchaya-karyakarpasoon-deshche-vice-president/