मानोरा- राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ एवरील वाईगौळजवळील वळण हे अपघातप्रवण ठरत असून,
सातत्याने अपघातांच्या घटनांमुळे वाहनधारकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या ठिकाणी धोक्याचा इशारा देणारे फलक तातडीने बसवावेत,
अशी मागणी नागरिक व वाहनधारकांकडून होत आहे.
राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाने उभारलेल्या सिमेंट
काँक्रीटच्या रुंद रस्त्यामुळे वाहनांना वेग घेता येतो.
मात्र, वेगावर नियंत्रण नसल्याने वळणांवर अपघातांचा धोका वाढला आहे.
साखरडोह, कोलार, आमगव्हाण, मानोरा, विठोली बेलोरा, माहुली, हातना,
पंचाळा पाटी या गावांमधून जाणारा हा महामार्ग वाहनांसाठी
सोयीचा ठरत असला तरी अपघातांच्या संख्येत वाढ होत आहे.
विशेषतः वाईगौळजवळील शेतकरी ध्रुव राठोड यांच्या शेतशिवारालगत
असलेले वळण हे अपघातांचे केंद्रबिंदू बनले आहे.
या ठिकाणी वाहनधारकांना वारंवार अपघातांना सामोरे जावे लागत
असल्याने सूचनाफलक किंवा इशारा चिन्हे लावून
वाहनचालकांना सतर्क करण्याची मागणी जोर धरत आहे.
वाहनधारकांचे म्हणणे आहे की, संबंधित विभागाने याकडे तातडीने
लक्ष देऊन उपाययोजना न केल्यास अपघातांचे प्रमाण आणखी वाढण्याची शक्यता आहे.