वाल्मिक कराडला जामीन मिळणार?
अटकेच्या वेळी नेमकं घडलं काय? वकिलाच्या दाव्यानं प्रकरणात मोठं ट्विस्ट
बीड :बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात अटकेत असलेला वाल्मिक कराड पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
कराड याने जामिनासाठी अर्ज दाखल केला असून त्यावरची पुढील सुनावणी ३० ऑगस्टला होणार आहे.
मात्र, या सुनावणीदरम्यान आरोपीच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवादामुळे प्रकरणाला मोठं ट्विस्ट आलं आहे.
वाल्मिक कराडला अटकेच्या वेळी अटकेची कारणे सांगितली नव्हती, असा दावा बचाव पक्षाने न्यायालयात केला.
यामुळे न्यायालय काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
उज्वल निकम यांची भूमिका
या प्रकरणावर बोलताना ज्येष्ठ सरकारी वकील उज्वल निकम म्हणाले –
“वाल्मिक कराडच्या वकिलाने त्याला जामीन मिळायला हवा, असा युक्तिवाद केला. मात्र आम्ही त्याला ठाम विरोध केला आणि पुराव्यांच्या आधारे आरोपी दोषी असल्याचे स्पष्ट केले.
दुसरा आरोपी विष्णू चाटे यानेही दोषमुक्तीसाठी अर्ज केला, परंतु आम्ही त्यावरही प्रतिवाद केला. अटकेची कारणे न सांगितल्याचा मुद्दा मांडण्यात आला, पण आम्ही न्यायालयाला सर्व
बाबी निदर्शनास आणून दिल्या आहेत.”
धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया
हत्या झालेल्या सरपंच संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख यांनीही संताप व्यक्त केला.
ते म्हणाले –
“आरोपीचे वकील त्यांना निर्दोष ठरवण्याचा प्रयत्न करत होते. पण निकम साहेबांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. आरोपींच्या मागे कोण आहेत हे स्पष्ट झालं आहे. पुढच्या तारखेला चार्ज
फ्रेम होईल अशी आमची अपेक्षा आहे. ही संघटीत गुन्हेगारी आहे आणि नियती कोणालाही सोडणार नाही.”
आता ३० ऑगस्टच्या सुनावणीत न्यायालय कोणता निर्णय देते, याकडे राज्याचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
Read also : https://ajinkyabharat.com/katepurna-dharanana-daha-darwaza-ughdle/