विटा शहरात पोलिसांची अतिरेकाची कारवाई?
वकिलाला मध्यरात्री अर्ध्या कपड्यात ओढत नेतल्याची खळबळजनक घटना,
वकिल संघटना आक्रमक
सांगली जिल्ह्यातील विटा भागामधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
मध्यरात्री आठ ते दहा पोलिसांनी एका वकिलाच्या घरात जबरदस्तीने प्रवेश करत त्यांना
अर्ध्या कपड्यातच फरफटत पोलिस ठाण्यात नेल्याचा आरोप होत आहे.
या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर पोलिसांच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त केला जात असून,
वकिल संघटनांनी तीव्र संताप व्यक्त करत संपूर्ण जिल्ह्यात एक दिवसाचं कामबंद आंदोलन पुकारलं आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
विटा शहरातील एका ठिकाणी तडीपार आरोपी राहत असल्याच्या संशयावरून गेल्या काही महिन्यांपासून पोलिसांची गस्त सुरू होती.
रात्री अपरात्री पोलीस घराजवळ फोटो आणि सेल्फी घेत असल्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त होते.
या संदर्भात वकिल विशाल कुंभार यांनी पोलिसांविरोधात तक्रार दाखल केली होती.
या तक्रारीनंतर दोन दिवसांनी, पोलिस अधिकाऱ्यासह आठ ते दहा पोलिस वकिलाच्या घरी गेले आणि मध्यरात्री त्यांच्या घरात शिरले.
विशेष म्हणजे, वकिल विशाल कुंभार यांना अर्ध्या कपड्यातच ओढत बाहेर काढत पोलिस ठाण्यात नेण्यात आले.
या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आल्याने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांचं स्पष्टीकरण आणि वकिलांचा आक्रोश
या कारवाईबाबत विचारणा केली असता विटा पोलिसांनी स्पष्ट केलं की, “संबंधित व्यक्तीने शासकीय कामात अडथळा निर्माण केला असल्याने
त्याच्यावर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात आली.” मात्र, वकिल संघटनांनी या स्पष्टीकरणाला साफ नाकारत पोलिसांची तुलना गावगुंडांशी केली आहे.
वकिल संघटनांनी यावर तीव्र प्रतिक्रिया देत सांगली जिल्ह्यातील सर्वच न्यायालयांमध्ये कामबंद आंदोलन पुकारलं.
तसेच, पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याची आणि संबंधित पोलिसांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली.
सीसीटीव्ही फुटेजमुळे पोलिसांची गोची
या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलं असून, त्यात वकिलाला गावगुंडासारखं फरफटत नेताना पोलिस दिसत आहेत.
त्यामुळे पोलिसांच्या कृत्यावर आणखी प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. आता वकिलांच्या संतप्त भावनांमुळे या प्रकरणात वरिष्ठ पातळीवर कारवाई होणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.
Read Also :https://ajinkyabharat.com/ganjachi-smuggling-doghe-attate/