जन्मदिवसच ठरला मृत्यूदिन… केक आणायला निघालेल्या तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू; आर्णी शहर शोकसागरात
आर्णी शहरातील शिवाजीनगर परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबावर नियतीने अतिशय क्रूर घाव घातला आहे. जन्म आणि मृत्यू हे जीवनाचे अंतिम सत्य असले तरी जन्मदिवसाच्याच दिवशी मृत्यू ओढवणे किती वेदनादायक असू शकते, याचा प्रत्यय या घटनेतून आला. कमल किराणा दुकानाचे मालक दीपक पाटील यांच्या एकुलत्या एक मुलाचा, यश उर्फ मुन्ना दीपक पाटील (वय 17) याचा वाढदिवसाच्या दिवशी झालेल्या अपघातात मृत्यू झाल्याने संपूर्ण आर्णी शहरात शोककळा पसरली आहे.
यशने नुकतेच दहावीचे शिक्षण पूर्ण केले होते आणि पुढील शिक्षणासाठी तो यवतमाळ येथे पॉलिटेक्निकचे शिक्षण घेत होता. 12 मार्च रोजी त्याचा वाढदिवस असल्याने आई-वडील सकाळी आर्णीहून यवतमाळला गेले होते. मुलासोबत वाढदिवस साजरा करून, त्याला शुभेच्छा देऊन ते परत घरी आले. दरम्यान, यश कॉलेजला जाऊन परत आपल्या राहत्या खोलीवर आला. संध्याकाळी मित्रांसोबत वाढदिवस साजरा करण्यासाठी तो स्वतः केक आणण्यासाठी दुचाकीवरून बाहेर पडला.
सायंकाळी सुमारे 7 वाजताच्या सुमारास यवतमाळमधील दारव्हा रोड परिसरात शिवगड हॉटेलसमोर त्याची दुचाकी रस्त्याच्या दुभाजकावर आदळली. या अपघातात त्याच्या डोक्याला जबरदस्त दुखापत झाली. स्थानिकांनी तत्काळ त्याला सरकारी रुग्णालयात दाखल केले. मात्र दुखापत गंभीर असल्याने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
ही दुर्दैवी घटना वाऱ्याच्या वेगाने आर्णी शहरात पसरताच सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात आली. सतरा वर्षांपूर्वी याच दिवशी दीपक पाटील यांच्या घरी आनंदाचे वातावरण होते. कुटुंबाचा वारस जन्माला आल्याने घर उजळून निघाले होते. पण नियतीने त्याच दिवशी सतरा वर्षांनी कुटुंबाचा दिवा कायमचा विझवला.
तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या, शिक्षणात प्रगती करणाऱ्या होतकरू मुलाचे असे अचानक निघून जाणे ही कुटुंबासाठी कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण करून गेले आहे. या घटनेमुळे पाटील कुटुंबासह परिसरातील नागरिक शोकसागरात बुडाले आहेत. अनेक शेजाऱ्यांच्या घरात चूलही पेटली नाही. शहरातील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून दीपक पाटील यांच्या दु:खात सहभाग नोंदवला.
या घटनेने पुन्हा एकदा रस्ते सुरक्षेचे महत्त्व अधोरेखित केले आहे. दुचाकी चालवताना सावधगिरी बाळगणे, हेल्मेटचा योग्य वापर करणे आणि वेगमर्यादा पाळणे किती आवश्यक आहे, याची जाणीव सर्वांना करून देणारी ही वेदनादायक घटना ठरली आहे.
अशा प्रकारे आनंदाचा दिवस क्षणात दु:खाच्या छायेत बदलल्याने संपूर्ण शहर सुन्न झाले असून, यशच्या आठवणींनी प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले आहेत.
read also:https://ajinkyabharat.com/helmet-violation-can-still-result-in-punishment-know-the-important-rules/
