शेतकऱ्यांच्या हिताची भाषा करणाऱ्या मोदींनी आधी त्यांच्या वाटचालीत ठोकलेले खिळे काढावेत – उद्धव ठाकरे यांचा केंद्रावर हल्लाबोल
अमेरिकेच्या ‘ट्रम्प टॅरिफ’चा फटका थेट सामान्य जनतेला बसणार असून, ट्रम्प भारताची खिल्ली उडवत असताना पंतप्रधान मोदी गप्प का?
देशाचं खरं नेतृत्व कोण करतंय, असा थेट सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
मोदी सरकारच्या भूमिका आणि धोरणांवर त्यांनी जोरदार हल्लाबोल केला.
मोदींच्या ‘शेतकरीप्रेमा’वर टीका
पंतप्रधान मोदींनी दिल्लीत स्वामीनाथन शताब्दी परिषदेत शेतकऱ्यांच्या हितासाठी ‘मोठी किंमत मोजायलाही तयार आहे’ असं विधान केलं.
यावर प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे म्हणाले, “शेतकऱ्यांच्या रस्त्यात खिळे ठोकणाऱ्या सरकारला आता अचानक त्यांचं दु:ख समजतंय?
हा ढोंगीपणा आता जगजाहीर झालाय. दिवसागणिक त्यांचा खोटेपणाचा बुरखा फाटतो आहे.”
“देशाला नेते हवेत, सेल्फीवीर नाहीत”
“आपल्या देशाला आज खरं नेतृत्व हवं आहे – एक मजबूत पंतप्रधान, गृहमंत्री आणि संरक्षणमंत्री.
परंतु सध्याचे पंतप्रधान केवळ प्रचाराची व सेल्फीबाजीची व्याख्या करत आहेत,” अशी टीका ठाकरे यांनी केली.
त्यांनी केंद्र सरकारच्या परराष्ट्र धोरणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. “ऑपरेशन सिंदूर झाल्यानंतरही मोदी पहलगामला गेले नाहीत, मात्र बिहारच्या प्रचार दौऱ्यावर गेले.
अमेरिका थेट धमक्या देत असताना, आपल्या गुप्तचर प्रमुखांना रशियाकडे पाठवण्यात आलं.
मोदी मात्र चीनच्या दिशेने झुकत असल्याचे दिसते,” असा आरोप त्यांनी केला.
अघोषित एनआरसीवर गंभीर प्रश्न
बिहार निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांतील गोंधळाचा उल्लेख करत उद्धव ठाकरे म्हणाले,
“जेव्हा मतदारांना स्वत:ची ओळख सादर करावी लागते, तेव्हा प्रश्न निर्माण होतो – देशात अघोषित एनआरसी सुरू झाली आहे का?”
त्यांनी मागणी केली की निवडणूक आयोगाने यावर स्पष्टीकरण द्यावं.
मोदींच्या वक्तव्यावर प्रतिउत्तर
पंतप्रधान मोदींनी आज आपल्या भाषणात शेतकऱ्यांच्या हितासाठी कुठलीही तडजोड न करण्याचं आश्वासन दिलं.
त्यांनी अमेरिकन टॅरिफचा थेट उल्लेख न करता, भारताचे शेतकरी, मच्छीमार आणि पशुपालक यांच्या बाजूने उभं राहण्याचा संदेश दिला.
“मला मोठी किंमत मोजावी लागली तरी मी तयार आहे,” असं त्यांनी म्हटलं.
मात्र, अमेरिकेने भारतातून आयात होणाऱ्या वस्तूंवर 25% टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे.
27 ऑगस्टपासून काही वस्तूंवर 25% अतिरिक्त सूट लागू होणार आहे. याचा थेट परिणाम भारतीय उत्पादकांवर होऊ शकतो.
दरवाढीमुळे अमेरिकन ग्राहक पर्यायी देशांकडून वस्तू मागवू शकतात, आणि त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला झटका बसण्याची शक्यता आहे.