ट्राली फसल्याने शेतमाल अडथळ्यात

अवैध रेती वाहतुकीमुळे शेतकरी हैराण

अडगाव बु – अडगाव बु परिसरातील अवैध रेती वाहतुकीमुळे शेतकरी आता शेतमाल वाहतूक करताना गंभीर समस्यांचा सामना करत आहेत. नदी नाल्यांमधील रस्त्यांची ऐशीतैशी झाल्याने शेतकऱ्यांना शेतातील तयार झालेले पिके घरी आणताना अडचणी येत आहेत.गावातील अनेक शेती रस्त्यांची अवस्था खराब असून, शेतकरी नदी नाल्या पार करून शेतमाल वाहतूक करतात. मात्र, महसूल विभागाच्या माहितीप्रमाणे, अवैध रेती वाहतुकीच्या कारणाने नदी नाल्यांमधील रस्त्यांची खोदाई सुरु आहे. यामुळे, आज शेतकऱ्याच्या सोयाबीन ट्राली नदीच्या नाल्यात फसली. ट्राली बाहेर काढण्यासाठी जेसीबीची मदत घ्यावी लागली.शेतकऱ्यांनी सांगितले की, आताही अतिवृष्टीमुळे पिकांची नासाडी झाली आहे, तर आता रेती वाहतुकीमुळे येणाऱ्या अडथळ्यांमुळे परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. शेतकरी भीती व्यक्त करत आहेत की, जर नाल्यात पुर आला, तर परिस्थिती किती भयंकर होईल याची कल्पनाही करता येत नाही.अवैध रेती वाहतुकीबाबत शेतकऱ्यांनी अनेकदा महसूल विभागाकडे तक्रारी दिल्या आहेत; मात्र विभागाचे दुर्लक्षामुळे या तक्रारींकडे योग्य लक्ष दिले जात नसल्याची शेतकरी तक्रार करीत आहेत. शेतकरी म्हणतात, “अस्मानी संकटामुळे हैराण झालेला शेतकरी आता सुलतानी संकटात सापडला आहे.”

read also : https://ajinkyabharat.com/social-mediavar-savadh-rahanyacha-salla/