प्रतिनिधी घुग्गुस, (जि. चंद्रपूर), दि. 20: येथील जनता विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात १९९७ च्या बॅचच्या विद्यार्थ्यांचा तब्बल २८ वर्षांनंतर स्नेहमीलन सोहळा मोठ्या उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला. जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी मुंबई, पुणे, कराडपासून ते नांदेडपर्यंत विखुरलेली ‘पाखरे’ पुन्हा आपल्या शाळेच्या अंगणात एकवटली होती. प्राचार्य, गुरुजन आणि बालपणीच्या मित्र-मैत्रिणींच्या सहवासात, सुख-दुःखाच्या देवाणघेवाणीत आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या जल्लोषात शाळेचे ते सोनेरी दिवस पुन्हा एकदा जिवंत झाले.
शाळेचे ते दिवस, वर्गातील तो बाकडा आणि मधल्या सुटीतील डबा… तब्बल २८ वर्षांनंतर जनता विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या १९९७ च्या बॅचमधील विद्यार्थ्यांनी या आठवणी पुन्हा एकदा जगल्या. स्नेहमीलन सोहळ्याच्या निमित्ताने मुंबई, पुणे, यवतमाळ, नांदेड आणि कराड अशा दूरवरच्या शहरांतून आलेले विद्यार्थी जेव्हा एकमेकांना भेटले, तेव्हा उपस्थितांचे डोळे पाणावले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलान आणि राष्ट्रगीताने झाली. दिवंगत शिक्षकांना यावेळी श्रद्धांजली अर्पण करून दोन मिनिटांचे मौन पाळण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य विठोबा पोले होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य विनायक आसुटकर, माजी प्राचार्य श्यामसुंदर धोपटे, कोंडूजी खुटेमाटे, कालिदास बोबडे, चंद्रशेखर बोबडे, मोरे व बोबडे मॅडम, नरेश बुच्चे, प्रीतम खोब्रागडे, श्री. मालेकर, श्री. शिखरे,अरुण गंधारे आणि मोहन गंधारे उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी गुलाबाच्या पाकळ्यांची उधळण करत आपल्या लाडक्या गुरुजनांचे जंगी स्वागत केले. शिक्षकेतर कर्मचारी सुवर्णा टेकाम, गिलबिले व आवारी यांचीही यावेळी उपस्थिती होती. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन प्रा. गजानन बोबडे व नीलिमा राऊत यांनी केले, तर प्रास्ताविक संजय लांडगे यांनी केले. विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या श्रीनिवास कुमरवार, संजय लांडगे यांच्यासह अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचा परिचय दिला. सांस्कृतिक कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्राची धुरा भारती कोसरे व सुजाता पाटील यांनी सांभाळली. प्रतीक्षा येवले यांच्या ग्रुपने स्वागतगीत सादर केले, तर सुजाता पाटील व वर्षा मडावी यांनी सादर केलेल्या नृत्याने उपस्थितांची मने जिंकली. बोबडे यांनी आयुष्यावर केलेली कविता आणि त्यानंतर डीजेच्या तालावर थिरकणारी पावले, यामुळे वातावरण भारावून गेले. हा अभूतपूर्व सोहळा यशस्वी करण्यासाठी अभय बुच्चे, पंडित दुबे, विनोद हेपट, श्रीकांत रोकडे, गणेश चामाटे, बाळकृष्ण निकेसर, जया धकाते, वैशाली गोरे, ज्योती रामीडवार, राणू भीतकर,
भारती बल्की आदींनी कार्यक्रमांची धुरा सांभाळली.
तर, वंदना साळवे, वनिता जगताप, किरण जुनगरे, थांबदेव डोहे, श्रीनिवास रामटेके, मदन डोंगे, पवन आगदारी, मेघा पेंदोर, रेखा कामातवार, उषा कोडमलवार, कणकलक्ष्मी, चंद्रकला बदकल, वंदना गंधारे, शीतल पाटील (हस्ते) आदींची याप्रसंगी उपस्थिती होती.
गुरु-शिष्याच्या नात्याची ‘सेकंड इनिंग’
शाळेत असताना ज्या शिक्षकांचा धाक वाटायचा, त्याच शिक्षकांसोबत २८ वर्षांनंतर मित्रत्वाच्या नात्याने गप्पा मारणे, हा अनुभव विलक्षण असतो. वयाने आणि अनुभवाने परिपक्व झालेले विद्यार्थी जेव्हा आपल्या गुरूंना भेटतात, तेव्हा त्या नात्याला एक वेगळीच झालर प्राप्त होते. विद्यार्थी कितीही मोठा अधिकारी किंवा व्यावसायिक झाला तरी, शिक्षकांसमोर तो ‘विद्यार्थीच’ असतो, हेच अशा सोहळ्यांचे खरे फलित असते. यातून मिळणारी ऊर्जा पुढील आयुष्यासाठी शिदोरी ठरते.
