कर्तव्यतत्परतेचे दर्शन; हृदयविकाराचा झटका आलेल्या तरुणासाठी पोलीस ठरला ‘देवदूत
यवतमाळ, दि. 19 : एसबीआय चौकात कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसाच्या तत्परतेमुळे आणि समयसूचकतेमुळे हृदयविकाराचा तीव्र झटका आलेल्या एका २५ वर्षीय बस प्रवाशाचे प्राण वाचले आहेत. धामणगाववरून येणाऱ्या बसमधील या रुग्णाला क्षणाचाही विलंब न लावता रुग्णालयात दाखल करून पोहवा निलेश झाडे यांनी खाकी वर्दीतील माणुसकीचे दर्शन घडवले असून त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
ही घटना दिनांक १ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ६:२० वाजताच्या सुमारास घडली. जिल्हा वाहतूक शाखा यवतमाळ येथे कार्यरत असलेले पोलीस हवालदार निलेश झाडे (ब.नं. ९३८) हे एसबीआय चौक येथे आपली ड्युटी बजावत होते. त्यावेळी धामणगाव ते यवतमाळ या मार्गावर धावणारी बस तिथे आली असता, बसमधील कंडक्टरने निलेश झाडे यांना तातडीने मदतीची विनंती केली. बसमधील प्रवासी रोशन गणेश बुटके (वय २५, रा. कवठा रेल्वे, ता. पुलगाव, जि. वर्धा) यांना प्रवासादरम्यान अचानक अस्वस्थ वाटू लागले आणि हृदयविकाराचा झटका आला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोहवा निलेश झाडे यांनी कसलाही विचार न करता त्वरित एका ऑटोची व्यवस्था केली आणि रुग्ण रोशन यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी उपचार सुरू केले आणि सांगितले की, रुग्णाला अगदी वेळेवर दवाखान्यात आणल्यामुळेच त्यांचे प्राण वाचले आहेत. या संकटसमयी देवासारखे धावून आलेल्या निलेश झाडे यांचे रोशन यांचे मित्र आणि नातेवाईकांनी अश्रू नयनांनी आभार मानले. या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी निलेश झाडे यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे विशेष अभिनंदन केले. ही माहिती जनसंपर्क अधिकारी तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक शुभांगी गुल्हाणे यांनी दिली असून, पोलिसांच्या या तत्परतेमुळे पोलीस दलाची प्रतिमा उंचावली आहे.
