मोखा-जानोरी मेळ गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या जानोरीमेड गावातील वार्ड क्रमांक १ मध्ये बांधण्यात आलेल्या रस्त्याच्या निकृष्ट दर्जाबाबत स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शिवहरी मस्के यांच्या घरापासून गौतम दिगंबर पर घर मोर यांच्या घरापर्यंत सुमारे सहा लाख रुपयांचा निधी मंजूर करून हा रस्ता 2023 च्या जानेवारी महिन्यात थाटामाटात भूमिपूजन करून तयार करण्यात आला होता. मात्र अवघ्या दोन वर्षांतच रस्त्याची दयनीय अवस्था समोर आली असून कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, रस्त्यावर अनेक ठिकाणी सिमेंट उखडलेले असून आत टाकलेले लोखंडी बार उघड्यावर दिसत आहेत. विशेष म्हणजे शिवहरी मस्के यांच्या घरासमोर सुमारे 14 फुटांचा लोखंडी बार उभा असल्याचे सांगितले जात आहे. हा बार कोणत्याही क्षणी अपघाताला आमंत्रण देऊ शकतो, अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे. रात्रीच्या वेळी किंवा पावसाळ्यात हा धोका अधिक वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी केली आहे.
ग्रामपंचायतीकडून ठेकेदारांची निवड करताना काही अटी-शर्ती पूर्ण केल्या जातात. मात्र या प्रक्रियेत पारदर्शकता नसल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. “अशा अटींमध्येच सर्व काही गुंतलेले असल्यामुळेच रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची होतात,” असे काही नागरिकांचे मत आहे. परिणामी नागरिकांच्या तसेच गुराढोरांच्या जीवाशी खेळ केला जात असल्याची भावना गावकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.
Related News
वार्ड क्रमांक १ मधील हा एकमेव मोठा विकासकाम असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे रस्ता दीर्घकाळ टिकेल, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली होती. परंतु दोन वर्षांतच रस्ता खराब झाल्याने ग्रामपंचायतीच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित होत आहेत. “जर काम दर्जेदार झाले असते, तर किमान पाच वर्ष तरी रस्ता टिकला असता,” असे मत शिवहरी मस्के यांनी व्यक्त केले. त्यांनी पुढे सांगितले की, 2023 मध्ये झालेल्या कामाचा निकृष्ट दर्जा 2026 मध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे.
स्थानिकांच्या मते, रस्त्याची नियमित तपासणी आणि देखभाल केली असती, तर परिस्थिती एवढी गंभीर झाली नसती. उभा असलेला लोखंडी बार ग्रामपंचायत किंवा संबंधित अधिकाऱ्यांच्या नजरेस कसा पडला नाही, असा सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. यामुळे प्रशासनाच्या उदासीनतेवर टीका होत आहे.
या प्रकरणामुळे ग्रामपंचायतीच्या विकासकामांच्या गुणवत्तेबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. नागरिकांनी संबंधित विभागाने तात्काळ पाहणी करून दोषींवर कारवाई करावी तसेच रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा भविष्यात एखादी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्नही गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, या प्रकरणावर ग्रामपंचायत किंवा संबंधित ठेकेदार यांची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप मिळालेली नाही. मात्र नागरिकांच्या वाढत्या नाराजीमुळे प्रशासनाने लवकरात लवकर ठोस पावले उचलणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.
