अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना शासनस्तरावर मदत मिळवून देण्यासाठी ठाम पाठपुरावा करू – आमदार शाम खोडे
वाशिम : गत चार दिवसांपासून झालेल्या अवकाळी व मुसळधार पावसामुळे मंगरूळपीर तालुक्यासह वाशिम जिल्ह्यातील अनेक भागात मोठे नुकसान झाले आहे.
उभ्या पिकांचे नुकसान, शेतजमीन खरडून जाणे, गुरेढोरे वाहून जाण्याच्या घटना आणि झोपड्यांमध्ये पाणी शिरल्याने शेतकरी व गोरगरीब शेतमजूर हवालदिल झाले आहेत. या
पार्श्वभूमीवर आमदार शामभाऊ खोडे यांनी प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले असून, नुकसानीचा संपूर्ण अहवाल शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
“शेतकऱ्यांना योग्य भरपाई मिळवून देणे ही प्राथमिक जबाबदारी”
आमदार खोडे म्हणाले, “शेतकऱ्यांवर आलेल्या या संकटाच्या काळात शासन आणि मी स्वतः ठामपणे तुमच्या सोबत आहे. पंचनामे करून मिळणाऱ्या मदतीत कुठलाही विलंब होऊ
देणार नाही. शासनदरबारी सातत्याने पाठपुरावा करून शेतकऱ्यांना योग्य भरपाई मिळवून देणे ही माझी प्राथमिक जबाबदारी आहे. शेतकरी हा देशाचा कणा आहे;
त्याला वंचित ठेवले जाणार नाही.”
आत्मविश्वासाने संकटावर मात करण्याचे आवाहन
खोडे पुढे म्हणाले, “नैसर्गिक आपत्तीसमोर कोणाचेही हात छोटे पडतात, पण धैर्य आणि आत्मविश्वासानेच संकटावर मात करता येते. शेतकरी बांधवांनी हताश न होता संयम बाळगावा.
शासन, प्रशासन व लोकप्रतिनिधी सर्वजण आपल्या मदतीसाठी सज्ज आहेत. ही लढाई एकत्रितपणे लढून आपण या आपत्तीवर मात करू.”
जिल्हा प्रशासनाला स्पष्ट सूचना
आमदार खोडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या असून, अधिकारी-कर्मचारी फिल्डवर उतरून मदतकार्य करत असल्याची माहिती दिली. शेतकरी, शेतमजूर आणि
सर्वसामान्य नागरिकांना धीर देत त्यांनी आश्वासन दिले की शासनस्तरावरून सर्वतोपरी प्रयत्न करून भरपाई मिळवून देण्यात येईल.
Read also : https://ajinkyabharat.com/kavad-palkhi-mahotswala-lagle-galbot/