अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना शासनस्तरावर मदत मिळवून देण्यासाठी ठाम पाठपुरावा करू – आमदार शाम खोडे

शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे नुकसान होऊन शेतजमीन खरडून गेली

मंगरूळपीर – गत दोन दिवसांपासून झालेल्या अवकाळी व मुसळधार पावसाने मंगरूळपीर तालुका तसेच वाशिम जिल्ह्यातील अनेक भागात प्रचंड हानी झाली आहे.

शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे नुकसान होऊन शेतजमीन खरडून गेली, तर काही ठिकाणी गुरेढोरे वाहून गेल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत.

गोरगरीब शेतमजुरांच्या झोपड्यांमध्ये पाणी शिरल्याने घरगुती साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे.

कापूस, सोयाबीन, तुरी, हळद आदी खरीप पिके पाण्याखाली गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

या गंभीर परिस्थितीची दखल घेत आमदार शामभाऊ खोडे यांनी प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले असून,

संपूर्ण नुकसानीचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

आमदार खोडे म्हणाले की,“शेतकऱ्यांवर आलेल्या संकटाच्या काळात शासन व मी स्वतः खंबीरपणे त्यांच्या सोबत उभा आहे.

पंचनाम्यातून मिळणाऱ्या मदतीत कुठलाही विलंब होऊ देणार नाही. शासनदरबारी सातत्याने पाठपुरावा करून शेतकऱ्यांना योग्य भरपाई मिळवून देणे ही माझी प्राथमिक जबाबदारी आहे.

शेतकरी हा देशाचा कणा असून त्याला वंचित ठेवले जाणार नाही.”

ते पुढे म्हणाले की,

“नैसर्गिक आपत्तीसमोर कोणाच्याही हातात उपाय नसतात, पण धैर्य व आत्मविश्वासानेच संकटावर मात करता येते.

शेतकरी बांधवांनी संयम बाळगावा. शासन, प्रशासन व लोकप्रतिनिधी सर्वजण मदतीसाठी सज्ज आहेत. ही लढाई एकत्र लढून आपण नक्कीच मात करू.”

यावेळी आमदार खोडे यांनी शेतकरी, शेतमजूर आणि नागरिकांना धीर देत आश्वासन दिले की, शासनस्तरावरून सर्वतोपरी प्रयत्न करून भरपाई मिळवून देण्यात येईल.

READ ALSO :https://ajinkyabharat.com/ajitdadankadun-congress-charct-program-pratibha-shinde-thousands-of-workers/