यंदाही का करावा लागतो आहे अन्नत्याग?

अन्नत्याग

यंदाही का करावा लागतो आहे अन्नत्याग?

19 मार्च 26 रोजी (या वर्षीही) मला अन्नत्याग/उपवास करणे भाग पडले आहे. कारण या वर्षीही महाराष्ट्रात दोन हजारांहून अधिक शेतकर्‍यांना आत्महत्या करणे भाग पडले आहे. त्या थांबविण्यात मी कमी पडलो. सरकारकडून शेतकरीविरोधी कायदे रद्द करून घेणे या वर्षीही जमले नाही. या आत्महत्यांची सर्वस्वी जबाबदारी सरकारची आहे. पण सरकारला लाज वाटत नाही. सरकार कोडगे झाले आहे. सरकार मारेकरी असल्यामुळे त्याला शेतकरी मेल्याचे दुःख होत नाही. मी चळवळीतला कार्यकर्ता आहे. अजूनही माझ्या संवेदना जाग्या आहेत. निरपराध माणसाची पावले मरणाकडे जाताना पाहून माझे मन कासावीस होते. मरणाकडे जाणारी पावले मला थांबवता येत नाहीत, ही जाणीव मला अस्वस्थ करते. असाह्यतेची जाणीव करून देते. या जाणिवेतून मला अन्नत्याग/उपवास करावा लागतो.

19 मार्च 2017ला मी असा उपवास करण्याचे ठरवले. त्यास संतोष अरसोड सारख्या अनेक मित्रांनी पाठिंबा दिला. महागावला (जि. यवतमाळ) अनेक मान्यवर माझ्यासोबत उपोषणाला बसले होते. त्यानंतर दरवर्षी 19 मार्चला अन्नत्याग/उपवास होत आहे. लाखो लोक अन्नत्याग करतात. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात, देशात काही प्रमाणात व अन्य देशातील किसानपुत्र काही प्रमाणात सहभागी होतात. या दिवसाला ’शेतकरी सहवेदना दिवस’असे नाव पडले. अन्नत्याग करून दिवस पालणारे हजारो कुटुंबे आहेत. या दहा वर्षांत सरकारवर शेतकरी आत्महत्याचा साधा ओरखडा देखील उमटला नाही पण शेतकरी जीवनात मोठी उलथापालथ झाली आहे.

साहेबराव करपे पत्नीसह

मागच्या दहा वर्षांच्या काळात शेती हे एकमेव उत्पन्नाचे साधन असणार्‍या शेतकर्‍यांची संख्या झपाट्याने कमी झाली आहे. हा एक मोठा बदल आहे. माझ्याकडे अधिकृत आकडेवारी उपलब्ध नाही, पण माझा नजरी-अंदाज असा आहे की, आज 85 टक्के ग्रामीण कुटुंबात शेतीबाह्य पैसा येऊ लागला आहे. शेती हे जळते घर आहे, आपण निखार्‍यावर चालत आयुष्य काढले असले तरी हे जळते आयुष्य लेकरांच्या वाट्याला येऊ नये, याची जाणीव झाल्याबरोबर 1980 पासून शेतकर्‍यांनी आपल्या मुलांना शेतीतून बाहेर काढायला सुरुवात केली. हे शेतकर्‍यांचे उपजत शहाणपण होते. कोण्या नेत्याने सांगितले म्हणून त्यांनी हा मार्ग स्वीकारला नाही तर परिस्थितीने त्यांना हे शहाणपण दिले आहे. शहराच्या जवळच्या खेड्यात सक्तीच्या स्थलांतराचे प्रमाण खूप जास्त आहे.

हे केवळ स्थलांतर नसून हे ’महान व्यवसायांतर’आहे. शेतीवरील अवलंबन कमी करणारी ही ऐतिहासिक घटना आहे. शेतकरी आत्महत्या कोणत्या कुटुंबात होतात? हे बारकाईने पाहिले तर दिसून येते की 1) तो अत्यल्प भू-धारक असतो 2) त्याचे एकमेव उत्पन्नाचे साधन शेती असते. शेतजमिनीच्या विखंडनाचे मुख्य कारण सीलिंग कायदा आहे. हा कायदा कायदेभंग सत्याग्रह करून मोडता येतो नाही. सरकारी कायद्यामुळेशेतीचे विखंडन शेतकरी थांबवू शकत नाही. तो कायदा सरकारच रद्द करू शकते. या ठिकाणी शेतकरी हतबल आहेत. पण ’उत्पन्नाचे एकमेव साधन शेती राहता कामा नये’ यासाठी मात्र शेतकरी जिवाचा आटापिटा करू शकतात.

तसा त्यांनी केला. 85 टक्के शेतकरी कुटुंबात आज शेतीबाह्य पैसा येऊ लागला आहे. याचा अर्थ त्या कुटुंबातील आत्महत्या टळली आहे. आज फक्त 15 टक्केच शेतकरी कुटुंबावर आत्महत्यांची तलवार लटकती आहे. शेतीवर अवलंबून असणार्‍यांची संख्या घटली म्हणून आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍यांची संख्या त्या प्रमाणात घटली का? तर तसे दिसून येत नाही. आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍यांची संख्या तेवढ्या प्रमाणात कमी झालेली दिसत नाही.

आजच्या पेक्षा दुप्पट कुटुंबे जेंव्हा शेतीवर अवलंबून होती, तेव्हा जेवढ्या आत्महत्या होत असत, जवळपास तेवढ्याच आत्महत्या आजही होत आहेत. याचा अर्थ, शेती आणि शेतकर्‍यांची परिस्थिती जास्त बिकट झाली आहे. काळोख अधिक गडद झाला आहे. वरील पार्श्‍वभूमीवर यंदाच्या 19 मार्चला अन्नत्याग करणे सयुक्तिक ठरते म्हणून मी हा उपवास करण्याचे ठरवले आहे. 2017ला पहिला अन्नत्याग/उपवास मी चिलगव्हाण (दिवंगत साहेबराव करपे यांचे गाव) येथे सुरू केला होता.

या वर्षी महात्मा फुले यांच्या भवानी पेठ, पुणे येथील वाड्यात असणार आहे. वरील सर्व परिस्थितीचा विचार करून मी 19 मार्चला अन्नत्याग करून आत्महत्या केलेल्या तमाम शेतकर्‍यांना श्रद्धांजली अर्पण करणार आहे आणि शेतकरी स्वातंत्र्यासाठी शेतकरीविरिद्ध असलेले कायदे रद्द करण्याचा निर्धार करणार आहे. तुमचे तुम्ही ठरवा.

 

अमर हबीब, किसानपुत्र आंदोलन
आंबाजोगाई (मो. 8411909909)