ठाकरे बंधूंची मोठी मागणी — मतदार याद्यांतील 400+ बोगस नावे, निवडणुका पुढे ढकला !

ठाकरे

तोपर्यंत निवडणुका पुढे ढकला; निवडणूक आयुक्तांच्या भेटीनंतर ठाकरे बंधूंची मागणी, काँग्रेस-राष्ट्रवादीचीही सहमती

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा निवडणूक प्रक्रियेवरून वाद पेटले आहेत. राज्यातील प्रमुख विरोधी पक्षांनी एकत्र येत, मतदार याद्यांमधील गंभीर त्रुटींवर निवडणूक आयोगाला धारेवर धरले आहे. उद्धव ठाकरे, राज ठाकरे, जयंत पाटील आणि बाळासाहेब थोरात यांनी एकत्र येत निवडणूक आयुक्तांची भेट घेऊन आगामी निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बोगस नावे, चुकीचे पत्ते, आणि पुनरावृत्ती झालेली माहिती आहे.

मतदार याद्यांवरील घोळ आणि ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर तीव्र टीका केली.त्यांनी म्हटले, “मी तर म्हणालोय, जर अशा पद्धतीने निवडणुका घ्यायच्या असतील तर इलेक्शन न घेता थेट सिलेक्शन करा. पण आम्ही हुकूमशाही सहन करणार नाही.”उद्धव ठाकरेंनी पुढे निवडणूक आयोगाला प्रश्न केला, “राज्य आणि केंद्रीय निवडणूक आयोगाचा बाप कोण? मतदार याद्या सुधारल्या नाहीत तोपर्यंत निवडणुका घेऊ नका.”ठाकरे यांनी व्यंगात्मक टीकाही केली, “117 आणि 124 वर्षांच्या वयाचे मतदार याद्यांमध्ये दिसतात, म्हणजे जगातलं सर्वात चांगलं हवामान महाराष्ट्रात असावं! जर हे खरे असेल तर पुनर्जन्मावर विश्वास ठेवावा लागेल. नाहीतर, हे मतदार जिवंत असताना त्यांचा मतदानाचा अधिकार हिरावून घेतला जातोय, डिलिट केला जातोय.”

राज ठाकरे म्हणाले — ‘आणखी 6 महिने निवडणुका न झाल्या तर काय फरक पडतो?’

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट भाषेत निवडणूक आयोगाला सुनावले. त्यांनी म्हटले,“2024 नंतरच्या मतदार याद्यांमध्ये मोठे घोळ आहेत. काहींना फोटो नाही, काहींना नावं नाहीत. निवडणूक आयोगाने याद्या राजकीय पक्षांना दाखवल्याच नाहीत. मग आम्ही लढणार कोणत्या याद्यांवरून?”त्यांनी पुढे सांगितले, “पाच वर्षे निवडणुका झालेल्या नाहीत, आणखी सहा महिने झाल्या नाहीत तर काय फरक पडतो? मतदार याद्या पूर्णपणे सुधारल्या नाहीत तोपर्यंत निवडणुका घेऊ नका.”राज ठाकरे यांनी हेही स्पष्ट केले की, “राजकीय पक्ष निवडणूक लढवतात, आयोग निवडणूक घेतो. पण आयोग जर याद्याच दाखवत नसेल, तर पारदर्शकता कुठे आहे?”

‘बोगस मतदारांचे पुरावे आमच्याकडे आहेत’ — जयंत पाटील

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी निवडणूक आयोगासमोर ठोस पुरावे सादर केले.त्यांनी सांगितले, “आम्ही कालच निवडणूक आयुक्तांना भेटलो आणि मतदार याद्यांतील चुका दाखवल्या. सीईओंनी आम्हाला सांगितले की, केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र जाईल. आज आम्ही आणखी पुरावे घेऊन भेटलो.”जयंत पाटील यांनी उदाहरणे देत सांगितले,“मुरबाडमध्ये एका बुथमध्ये 400 मतदार एका घरात दाखवले आहेत. वडनेर आणि कामटीमध्ये घर क्रमांकच नाहीत. काही ठिकाणी एकाच व्यक्तीचा EPIC नंबर असूनही त्याचे नाव अनेकदा आहे. नालासोपाऱ्यात एका महिलेचे नाव सहा वेळा नोंदवले गेले आहे. दुपारी 3 वाजता नावं असतात, संध्याकाळी 6 वाजता गायब होतात! हे सर्व कोणाच्या सांगण्यावर होते?”त्यांनी पुढे गंभीर आरोप केला — “महाराष्ट्र निवडणूक आयोगाचं सर्व्हर दुसरं कोणी चालवतंय का? राज्य किंवा केंद्राच्या बाहेरून काही शक्ती या प्रक्रियेत हस्तक्षेप करत आहेत का?”

थोरात म्हणाले — ‘1 जुलैची मतदार यादी दोषपूर्णच अंतिम केली’

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी निवडणूक आयोगावर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी म्हटले,“1 जुलै रोजी निवडणूक आयोगाने मतदार यादी अंतिम केली, पण त्या यादीत एकही दुरुस्ती केलेली नाही. आम्ही आधीच सांगितलं होतं की, यात दोष आहेत. तरीही आयोगाने यादी अंतिम केली.”थोरात यांनी आणखी स्पष्ट केले, “आम्ही राज्य आणि केंद्रीय निवडणूक आयोगाला भेटलो, पण त्यांचं उत्तर समाधानकारक नव्हतं. या दोषपूर्ण याद्यांवर निवडणुका घेतल्या गेल्या तर लोकशाहीवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल.”

‘सर्व विरोधी पक्ष एकत्र, भाजप गैरहजर’

या बैठकीत उद्धव ठाकरे, राज ठाकरे, जयंत पाटील आणि बाळासाहेब थोरात हे उपस्थित होते. मात्र, भाजपचे प्रतिनिधी अनुपस्थित होते. उद्धव ठाकरेंनी यावर टीका करत म्हटले,
“भाजपलाही आम्ही पत्र दिलं होतं, पण ते आले नाहीत. आम्ही आधीच इशारा दिला होता की काही भाजप कार्यकर्ते मतदार याद्यांशी खेळ करत आहेत. आता आयोगावर जबाबदारी आहे की त्यांनी सत्य उघड करावं.”

विरोधकांचा एकमुखी निष्कर्ष : मतदार याद्यांमध्ये सुधारणा न झाल्यास निवडणुका नकोत

विरोधी पक्षांच्या सर्व नेत्यांचा एकच ठाम निष्कर्ष —“मतदार याद्यांमधील बोगस नावे, चुकीचे पत्ते आणि पुनरावृत्तीची प्रकरणे दूर होईपर्यंत कोणतीही निवडणूक घेऊ नका.”ते म्हणाले, “लोकशाहीत पारदर्शक निवडणूक हीच खरी ताकद आहे. मतदारांच्या नावांमध्ये घोळ राहिले, तर मतदानाचा अधिकारच निरर्थक ठरेल.”

पुढील पाऊल काय?

या भेटीनंतर निवडणूक आयोगाकडून कोणती अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, विरोधी पक्षांनी स्पष्ट केले की, जर निवडणुका दोषपूर्ण मतदार याद्यांवर घेतल्या गेल्या तर ते तीव्र आंदोलन करतील.
राज ठाकरे यांनी सांगितले, “उद्या-परव्यात आयोग काय निर्णय घेतो ते पाहू. त्यानंतर आम्ही आमचा पुढील निर्णय जाहीर करू.”राज्यातील विरोधी पक्षांनी मतदार याद्यांतील घोळ आणि निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर थेट हल्ला चढवत, निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. उद्धव आणि राज ठाकरे यांच्यासह काँग्रेस-राष्ट्रवादी नेते एकत्र आल्याने या विषयावर मोठं राजकीय समीकरण बदलू शकतं. आता आयोग पुढे कोणता निर्णय घेतो, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

read also : https://ajinkyabharat.com/forestry-office-closed-for-many-days/