तेल्हारा: नगरपरिषद कार्यालयातील मनमानी कारभार,
अपूर्ण राहिलेल्या तक्रारी आणि नागरिकांच्या समस्या न सोडविल्याबद्दल
तीव्र नाराजी व्यक्त करत सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र गोकुलचंद सुईवाल यांनी येत्या
८ सप्टेंबर २०२५ रोजी तेल्हारा नगरपरिषद कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे.
सुईवाल यांनी दिलेल्या निवेदनानुसार, त्यांनी यापूर्वी अनेक वेळा पोलीस स्टेशन,
जिल्हाधिकारी कार्यालय आणि नगरपरिषद प्रशासनाकडे लेखी तक्रारी व स्मरणपत्रे दिली होती.
१ फेब्रुवारी २०२५ रोजी पोलीस स्टेशनला रिपोर्ट दाखल करून
दुकान साहित्य सरकारी वाहनात असल्याचे जीपीएस पुरावे दिले होते.
त्यानंतर २१ फेब्रुवारी, २९ जून आणि ४ ऑगस्ट रोजी विविध पातळ्यांवर तक्रारी व स्मरणपत्रे दिली.
मात्र, अद्यापही योग्य ती कारवाई न झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
निवेदनात मुख्याधिकारी सतीश गावंडे यांच्या मनमानी कारभारामुळे
शासनाच्या विविध योजना केवळ कागदोपत्री मर्यादित राहिल्याने सामान्य नागरिक वंचित राहत असल्याचे म्हटले आहे.
या पार्श्वभूमीवर, योग्य ती कार्यवाही जिल्हाधिकारी कार्यालय
व पोलीस अधीक्षक कार्यालयाने केली नाही तर उपोषणाशिवाय पर्याय राहणार नाही,
असे सुईवाल यांनी स्पष्ट केले आहे.
तसेच, “मी आमरण उपोषणास बसल्यानंतर माझ्या जीवाला काहीही अपघात अथवा
अनुचित प्रकार घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी महाराष्ट्र शासनाची असेल,”
असा इशाराही त्यांनी दिला आहे.
नागरिकांच्या समस्यांचे निवारण करून योग्य ती कारवाई केल्यास उपोषण मागे घेतले जाईल,
असेही सुईवाल यांनी निवेदनात नमूद केले आहे.
Read more:https://ajinkyabharat.com/birla-gatejav-electric-wire-padlrayane-mazur-gambhir-wound/