नागपूर – शासकीय थकबाकीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या
एका कंत्राटदाराने अखेर आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले.
या घटनेने नागपूरसह राज्यभरात खळबळ उडाली आहे.
पी. व्ही. वर्मा (कंत्राटदार) असे मृताचे नाव असून,
जवळपास ३० कोटी रुपयांचे थकीत बिल शासनाकडे प्रलंबित होते.
थकीत बिलांचा बोजा आणि आर्थिक संकट
मिळालेल्या माहितीनुसार,
वर्मा यांचे वर्धा जिल्ह्यातील एमआयडी देवळी येथे काम सुरू होते.
मात्र शासनाकडे बिल प्रलंबित राहिल्याने ते गंभीर आर्थिक संकटात सापडले.
अखेर त्यांनी नागपूरच्या राजनगर येथील राहत्या घरी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली.
राज्यात ९० हजार कोटींची थकबाकी
राज्य कंत्राटदार संघटनेचे एम. सरोदे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की,
“राज्यातील कंत्राटदारांचे तब्बल ९० हजार कोटी रुपयांचे बिल थकीत आहे.
यामुळे अनेक कंत्राटदार अडचणीत सापडले आहेत.
नागपूरमधील ही घटना त्याच संकटाचे द्योतक आहे.”
त्यांनी पोलिस प्रशासन आणि शासनाने यामध्ये तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी केली आहे.
या घटनेने नागपूरसह कंत्राटदार वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून,
शासनाच्या धोरणांबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.