तांत्रिक अडचणीमुळे भारतीय विमान सेवा बनली धोकादायक

भारतातील विमान सेवा संकटात

भारतातील विमान वाहतूक उद्योग हा झपाट्याने वाढणारे आणि देशाच्या प्रगतीला चालना देणारे एक महत्त्वाचे क्षेत्र आहे.

लाखो प्रवासी दररोज देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवास करत असतात.

परंतु या प्रवासात वाढत्या सोयीसुविधांबरोबरच विमानातील तांत्रिक अडचणी चिंतेची बाब बनत चालली आहे .

कारण, विमान कंपन्यांच्या ताफ्यात तांत्रिक अडचणींची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे

त्यामुळे विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांच्या सुरक्षेचा प्रश्न चिंताजनक पातळीवर पोहोचला आहे.

गेल्या पाच वर्षांत देशात तब्बल ६५ वेळा उड्डाणादरम्यान इंजिन बंद पडले

आणि ११ वेळा आपत्कालीन मदतीसाठी ‘मे-डे’ संदेश द्यावा लागला.

नागरी विमान वाहतूक संचालनालयाच्या आकडेवारीनुसार, केवळ २०२५ सालातच १८३ तांत्रिक दोष विविध विमान कंपन्यांनी नोंदवले आहेत.

हे आकडे भारताच्या विमान वाहतूक क्षेत्रासाठी धोक्याची घंटा ठरत आहेत.

एअर इंडियाचे धक्कादायक आकडे

या यादीत सर्वात चिंताजनक बाब म्हणजे राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित कंपनी एअर इंडिया गट आघाडीवर आहे.

केवळ या गटातच मागील पाच वर्षांत ५४१ तांत्रिक दोष आढळले. यावर्षीच ८५ अडचणी समोर आल्या आहेत.

इंधन पुरवठा, इलेक्ट्रॉनिक नियंत्रण प्रणाली, उतरणीचे चाक यांसारख्या महत्त्वाच्या भागांमध्ये

अडचणी आढळल्याने प्रवासी सुरक्षिततेवर मोठा प्रश्नचिन्ह उभा राहतो.

इतर कंपन्यांमध्येही स्थिती चिंताजनक

एअर इंडियानंतर इंडीगो या खाजगी कंपनीकडून यावर्षी ६२ तांत्रिक दोष,

आकासा एअर कडून २८, तर स्पाईसजेट कडून ८ अडचणी नोंदविण्यात आल्या आहेत.

प्रवाशांची सर्वाधिक संख्या हाताळणाऱ्या इंडीगोच्या ताफ्यात वारंवार त्रुटी आढळणे ही धोक्याची घंटा मानावी लागेल.

प्रवासी सुरक्षिततेची तडजोड

आज प्रवासी विमानात बसतो तेव्हा त्याला सुरक्षित प्रवासाची खात्री हवी असते.

मात्र उड्डाणादरम्यान इंजिन बंद पडणे किंवा इंधनपुरवठा थांबणे यांसारख्या घटना कोणत्याही क्षणी जीवघेण्या ठरू शकतात.

या घटना पायलटांचे धाडस, तत्परता आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांची झटपट कामगिरी यामुळे सावरल्या गेल्या, हे खरे आहे.

पण वारंवार होणाऱ्या चुका हा व्यवस्थेतील मोठा दोष आहे हे नाकारता येत नाही.

काटेकोर उपाययोजना अपरिहार्य

नागरी विमान वाहतूक संचालनालयाने सर्व कंपन्यांना नियमित तपासणीचे आदेश दिले आहेत.

आंतरराष्ट्रीय पातळीवरील काटेकोर नियम पाळणे, प्रशिक्षित तांत्रिक कर्मचारी नेमणे,

सुटे भाग उपलब्ध करून देणे, तसेच ‘प्रतिबंधात्मक देखभाल’वर भर देणे, या सुधारणा तातडीने लागू करणे आवश्यक आहे.

सुरक्षिततेवर तडजोड करून व्यापारी स्पर्धा जिंकण्याचा प्रयत्न अखेरीस भीषण दुर्घटना घडवून आणू शकतो.

भारतीय विमान वाहतूक क्षेत्र हा प्रगतीचा कणा आहे, पण तो विश्वासावर टिकलेला आहे.

आज जर प्रवाशांचा विश्वास हादरला, तर या क्षेत्राचा पाया डळमळेल.

म्हणूनच एअर इंडिया असो किंवा इंडीगो, आकासा एअर असो वा स्पाईसजेट,

सर्व कंपन्यांनी सुरक्षिततेला प्राधान्य देणे हाच एकमेव मार्ग आहे.

सरकारने देखील देखरेखीतील कठोरता वाढवली पाहिजे.

सुरक्षिततेचा प्रश्न हा केवळ आकड्यांचा खेळ नाही, तर प्रत्येक प्रवाशाच्या जीवाशी निगडीत आहे.

आणि म्हणूनच या गंभीर इशाऱ्याकडे वेळेत लक्ष दिले नाही तर पुढे मोठे संकट ओढवेल यात शंका नाही.

READ ALSO :https://ajinkyabharat.com/covid-19-drug-case-delhi-hc-has-not-stopped-the-gautam-gambhir-yawar-trial-court/