स्वातंत्र दिनी जनतेच्या कमरेत लाथ -पोलिसांच्या वर्तनावर संताप

आंदोलकाला पोलीस अधिकाऱ्याची ‘फिल्मी स्टाईल’ लाथ

Jalna Police Viral Video : आंदोलकाला पोलीस अधिकाऱ्याची ‘फिल्मी स्टाईल’ लाथ, व्हिडिओ व्हायरल; पोलिसांच्या वर्तनावर संताप

जालना : जालना जिल्ह्यातील पोलिसांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

पालकमंत्री पंकजा मुंडे यांना भेटण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषणाला बसलेल्या आंदोलकाला

डीवायएसपी अनंत कुलकर्णी यांनी ‘फिल्मी स्टाईल’ लाथ मारल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या घटनेनंतर पोलिसांच्या वर्तनावर संताप व्यक्त होत असून प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

काय आहे प्रकार?

गोपाळ चौधरी नावाचे एक व्यक्ती मागील तीन दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषणाला बसले होते. त्यांच्या तक्रारीनुसार, त्यांच्या पत्नीने परपुरुषासोबत पळून जाऊन लग्न केले

असून या प्रकरणात त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली होती. मात्र, पोलिसांनी ‘पैसे खाल्ल्यामुळे कारवाई केली नाही’ असा गंभीर आरोप आंदोलकाने केला आहे. याच कारणास्तव त्यांनी उपोषण सुरू केलं होतं.

दरम्यान, मंत्री पंकजा मुंडे जिल्हाधिकारी कार्यालयात येत असल्याने “आम्हाला त्यांना भेटू द्या, अन्यथा आत्मदहन करू” असा इशारा आंदोलकांनी दिला होता.

व्हिडिओ व्हायरल, पोलिसांवर टीका

या दरम्यान आंदोलकांना पकडून ठेवण्यात आलं असतानाच डीवायएसपी अनंत कुलकर्णींनी एका आंदोलकाला लाथ मारली. सिनेमातील दृश्यासारखा हा प्रकार पाहून उपस्थित नागरिक चक्रावले.

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटिझन्सकडून पोलिसांच्या वर्तनावर तीव्र टीका होऊ लागली आहे.

पोलिसांचं स्पष्टीकरण

यावर अनंत कुलकर्णी यांनी आपलं स्पष्टीकरण देताना सांगितलं की, “आंदोलकांनीच महिला पोलिसांवर रॉकेल टाकण्याचा प्रयत्न केला होता.

त्यामुळे आम्हाला बळाचा वापर करावा लागला,” असं त्यांनी म्हटलं आहे. मात्र, नागरिकांच्या नजरेत पोलीस अधिकाऱ्यांचा लाथ मारतानाचा व्हिडिओ ठसला आहे.

➡️ या घटनेनंतर प्रशासन आणि पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

READ ALSO :https://ajinkyabharat.com/nathabhauchaya-manat-tar-mehi-swatala-stuck/