स्वातंत्र्यदिन २०२५ : युवांसाठी रोजगार योजना

स्वातंत्र्यदिन २०२५ : युवांसाठी रोजगार योजना

स्वातंत्र्यदिन २०२५ : युवांसाठी रोजगार योजना, जीएसटी सुधारणा; पंतप्रधान मोदींची लाल किल्ल्यावरून मोठी घोषणा

नवी दिल्ली – स्वातंत्र्यदिनाच्या ७९ व्या पर्वावर लाल किल्ल्याच्या प्राचीरावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्राला संबोधित करताना देशाच्या विकास, सुरक्षाबळ, तंत्रज्ञानातील आत्मनिर्भरता आणि युवांच्या भविष्यावर केंद्रित अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. “आजादीचं हे महापर्व म्हणजे १४० कोटी संकल्पांचं पर्व आहे. प्रत्येक नागरिकाने यात आपली भूमिका पार पाडली पाहिजे,” असं ते म्हणाले.

युवांसाठी ‘प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना’
पंतप्रधानांनी खास करून युवांसाठी १ लाख कोटी रुपयांच्या ‘प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना’ची आजपासून अंमलबजावणी जाहीर केली. खासगी क्षेत्रात पहिली नोकरी मिळवणाऱ्या युवक-युवतींना सरकारकडून १५ हजार रुपयांची थेट मदत मिळणार आहे. ही पहिलीच वेळ आहे की खासगी क्षेत्रातील रोजगारासाठी सरकारकडून आर्थिक लाभ दिला जाणार आहे.

ऊर्जा आत्मनिर्भरतेकडे वेगाने वाटचाल
११ वर्षांत सौरऊर्जेत ३० पट वाढ, जलविद्युत व ग्रीन हायड्रोजन प्रकल्पांमध्ये गुंतवणूक, १० नवीन अणुभट्टी कार्यरत, तसेच २०४७ पर्यंत अणुऊर्जा क्षमता दहापट करण्याचं उद्दिष्ट त्यांनी मांडलं.

क्रिटिकल मिनरल मिशन
संरक्षण, तंत्रज्ञान आणि वैद्यकीय क्षेत्रासाठी आवश्यक खनिजांच्या शोधासाठी १,२०० हून अधिक ठिकाणी शोधमोहीम सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

स्पेस स्टेशन व जेट इंजिन
२०४७ पर्यंत भारताचं स्वतःचं स्पेस स्टेशन उभारण्याचं आणि मेड इन इंडिया जेट इंजिन निर्मितीचं आवाहन पंतप्रधानांनी केलं.

‘ऑपरेशन सिंदूर’ची दखल
भारतीय सैन्याच्या कारवाईचे कौतुक करताना “सेनेला खुली मुभा देण्यात आली. त्यांनी शत्रूच्या भूमीत घुसून दहशतवादी ठाणी उद्ध्वस्त केली आणि पाकिस्तानची झोप उडवली,” असं ते म्हणाले.

क्लीन एनर्जी आणि समुद्र मंथन मिशन
२०३० पर्यंतचं स्वच्छ ऊर्जेचं उद्दिष्ट २०२५ मध्येच गाठल्याचा दावा पंतप्रधानांनी केला. ‘समुद्र मंथन मिशन’अंतर्गत तेल आणि गॅस साठ्यांचा शोध सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं.

फर्टिलायझरमध्ये आत्मनिर्भरता
विदेशी अवलंबन संपवून देशातच खतनिर्मिती वाढवण्याचं आवाहन उद्योगजगत व युवांना त्यांनी केलं.

मिशन सुदर्शन चक्र
युद्धतंत्रज्ञान विस्तारासह देशाची सुरक्षा अधिक बळकट करण्याचा संकल्प पंतप्रधानांनी जाहीर केला.

भाषा विकास आणि आरोग्य
सर्व भारतीय भाषांच्या विकासासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन करताना त्यांनी “ज्ञान-विज्ञानात भाषांचं योगदान वाढलं पाहिजे” असं मत व्यक्त केलं. मोटाप्याविषयी इशारा देत त्यांनी तेलाच्या वापरात १० टक्के कपातीचं सुचवलं.

पिछड्या भागांचा विकास
पूर्व भारतासह देशातील पिछड्या जिल्हे व तालुक्यांसाठी विशेष विकास योजना लागू होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

जीएसटी सुधारणा दिवाळीपासून
पंतप्रधानांनी जाहीर केलं की या दिवाळीपासून ‘नेक्स्ट जनरेशन जीएसटी रिफॉर्म’ लागू होतील. यामुळे एमएसएमई क्षेत्राला विशेष लाभ मिळणार आहे. महागाई नियंत्रणात असल्याचा, परकीय चलन साठा भक्कम असल्याचा आणि जागतिक संस्थांकडून भारताच्या अर्थव्यवस्थेचं कौतुक होत असल्याचा उल्लेख त्यांनी केला.

सिंधु करारावर ठाम भूमिका
“भारताच्या हक्काचं पाणी आपल्या शेतकऱ्यांसाठी आहे. रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही,” असं ठाम मत त्यांनी मांडलं.

READ ALSO :https://ajinkyabharat.com/charital-vahatukit-shaist-aana/