स्वच्छ भारत मिशनच्या कामांचा बोजवारा; जानोरी मेळ–मोखा ग्रामस्थांमध्ये संताप

स्वच्छ भारत

निंबा अंदुरा सर्कलमधील मोखा–जानोरी मेळ गट ग्रामपंचायत अंतर्गत स्वच्छ भारत मिशनअंतर्गत करण्यात आलेल्या कामांचा बोजवारा उडाल्याचे गंभीर चित्र सध्या समोर आले आहे. शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनेतून गाव स्वच्छ, सुंदर व आरोग्यदायी करण्याचा उद्देश असला, तरी प्रत्यक्षात मात्र निकृष्ट दर्जाची कामे, नियोजनाचा अभाव आणि प्रशासनाच्या उदासीनतेमुळे लाखो रुपयांचा निधी वाया जात असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे.

जानोरी मेळ येथे चार ठिकाणी तर मोखा गावात तीन ठिकाणी उभारण्यात आलेले कचरापेटी बॉक्स आज वापराअभावी निष्क्रिय ठरत आहेत. या बॉक्सचा नियमित वापर न होता ते केवळ शोभेच्या वस्तू ठरल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे अनेक कचरापेटी बॉक्सवर मोठमोठ्या बाभळीची झाडे वाढलेली असून, अतिक्रमण स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे ही कामे किती दर्जेदार पद्धतीने करण्यात आली, याबाबत ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

ग्रामपंचायतीमार्फत या कामांसाठी लाखो रुपयांची बिले अदा करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. ९९ हजार रुपये खर्चून घंटागाडी खरेदी केल्याचे दाखवण्यात आले असून, ६८ हजार रुपये घनकचरा व्यवस्थापनासाठी खर्च केल्याची नोंद आहे. तसेच जिल्हा परिषद शाळांमधील हॅन्डवॉशसह विविध कामांची बिले सादर करण्यात आली आहेत. मात्र प्रत्यक्ष परिस्थिती पाहता आजतागायत एकच घंटागाडी गावात कार्यरत असून, दुसरी घंटागाडी खरेदी केल्याचा दावा व प्रत्यक्ष स्थिती यामध्ये मोठी तफावत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.

Related News

ओला व सुका कचरा वेगळा करण्याबाबत कोणतेही ठोस नियोजन नसल्यामुळे कचरापेटी बॉक्सचा अपेक्षित उपयोग होत नाही. वर्ष उलटून गेले तरी घनकचरा व्यवस्थापनासाठी आवश्यक असलेले कर्मचारी अद्याप नियुक्त करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे स्वच्छ भारत मिशन केवळ कागदावरच राबवले जात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. ग्रामपंचायतीने ग्रामसभेमध्ये सर्व खर्च, बिले, खरेदी प्रक्रिया आणि नियोजनाची सविस्तर व स्पष्ट माहिती द्यावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

यासोबतच जानोरी मेळ व मोखा येथील जिल्हा परिषद शाळांकडेही मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष झाल्याचा आरोप आहे. मोखा शाळेच्या परिसरात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाणी साचत असून, विद्यार्थ्यांना अक्षरशः पाण्यातून शाळेत जावे लागते. ही बाब विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत धोकादायक असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. पंधराव्या वित्त आयोगातून पेव्हर ब्लॉक बसवून शाळेचा परिसर सुरक्षित व स्वच्छ करण्यात यावा, अशी मागणी वारंवार करूनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत व्यक्त करण्यात येत आहे.

दोन्ही गावांमधील नाल्यांची नियमित साफसफाई होत नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरली असून साप, विंचू व इतर जीवजंतूंचा धोका वाढला आहे. २५ डिसेंबर रोजी एका नागरिकाच्या घरासमोर मोठा साप आढळून आल्याची घटना घडली होती. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यास जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित होत आहे.

सध्या जानोरी मेळ व मोखा या दोन गावांसाठी केवळ एकच कर्मचारी उपलब्ध असल्याने सर्व कामे रखडत असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रत्येक गावासाठी स्वतंत्र कर्मचारी नियुक्त करावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच घरपट्टी व पानपट्टी वसुलीबाबत योग्य नियोजन करून बैठक घेण्यात यावी आणि नागरिकांना विश्वासात घ्यावे, अशीही ठाम भूमिका ग्रामस्थांनी मांडली आहे.

स्वच्छ भारत मिशनअंतर्गत झालेल्या कामांची चौकशी करून दोषी ठेकेदार व संबंधितांवर कारवाई करावी, ग्रामपंचायतीने सर्व व्यवहार पारदर्शक ठेवावेत आणि दर्जेदार कामे पूर्ण करावीत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. आता ग्रामपंचायत प्रशासन यावर तातडीने काय पावले उचलते, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.

read also : https://ajinkyabharat.com/7-powerful-benefits-of-orange-peel-skin-care-ajibainchas-magical-remedy-makes-the-face-as-stunning-as-a-queen/

Related News