कमाई लष्करासाठी अर्पण

सूर्यकुमार यादवचा देशभक्तीचा निर्णय!

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने आशिया कप 2025 जिंकल्यानंतर एक मोठा आणि प्रेरणादायी निर्णय घेतला आहे. त्याने या स्पर्धेत मिळालेलं संपूर्ण सामना शुल्क भारतीय लष्कर आणि पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना देण्याची घोषणा केली आहे. दुबईत झालेल्या आशिया कप 2025 मध्ये सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारताने पाकिस्तानचा पराभव करून विजेतेपद पटकावले. विजय मिळाल्यानंतर सूर्यकुमारने सोशल मीडियावर एक पोस्ट करत सांगितले,“मी व्यक्तिगत सर्व 7 सामन्यांचे शुल्क भारतीय लष्कराला देणार आहे. थोडा उशीर झाला, पण या योगदानाचा मला अभिमान आहे.” वृत्तानुसार, प्रत्येक भारतीय खेळाडूला एका T20 सामन्यासाठी सुमारे ₹4 लाख मानधन मिळते. सूर्यकुमार यादवने आशिया कपमध्ये 7 सामने खेळले असून, त्यानुसार त्याची एकूण कमाई ₹28 लाख रुपये झाली. ही रक्कम आता थेट भारतीय लष्कर आणि पीडित कुटुंबियांना देण्यात येणार आहे. आशिया कपच्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानला 5 गडी राखून पराभूत केले. तिलक वर्माने अर्धशतक झळकावले, तर संजू सॅमसन आणि शिवम दुबे यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. या विजयासह भारताने दुसरा T20 आशिया कप आणि एकूण 9 वेळा आशिया कप जिंकला आहे. अंतिम सामन्यानंतर भारतीय संघाने ACC आणि PCB अधिकाऱ्यांकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. नंतर आयोजकांनी ट्रॉफी मंचावरून हटवली आणि PCB चे संचालक मोहसिन नकवी ट्रॉफी घेऊन हॉटेलकडे रवाना झाले. सूर्यकुमार यादवचा हा निर्णय संपूर्ण देशभरात कौतुकास्पद ठरत आहे. क्रिकेटप्रेमी आणि चाहत्यांनी सोशल मीडियावर त्याच्या या देशभक्तीपूर्ण योगदानाचे स्वागत केले आहे.

read also:https://ajinkyabharat.com/shekado-rainchi-tradition-maintained-today/