वाद, धमक्या आणि संघर्ष

आयुष्याच्या सर्वांत अंधाऱ्या काळाची कहाणी

 बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या आयुष्यातील सर्वात कठीण काळावर उघडपणे भाष्य केलं आहे. अभिनेत्री ऐश्वर्या रायसोबतच्या ब्रेकअपनंतरचा त्रास, सलमान खानसोबतचा वाद आणि त्यातून सावरताना झालेलं मानसिक संघर्ष याविषयी त्याने प्रामाणिक कबुली दिली आहे. विवेक ओबेरॉय आणि ऐश्वर्या राय यांचं नातं एकेकाळी चर्चेत होतं. मात्र, या नात्याचा शेवट अत्यंत नाट्यमय पद्धतीने झाला. 2003 साली विवेकने पत्रकार परिषद घेऊन अभिनेता सलमान खानवर धमकावल्याचे गंभीर आरोप केले होते. या वादानंतर विवेकच्या करिअरवर मोठा परिणाम झाला आणि त्याला बॉलिवूडमध्ये काम मिळवण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागला. त्या काळाविषयी विवेक म्हणतो, “मी अत्यंत संवेदनशील आणि भावूक व्यक्त आहे. हृदयभंगाची भीती आता नाही, कारण मी ते अनुभवलं आहे. त्या काळात आयुष्य भयावह, एकाकी आणि घुसमटल्यासारखं वाटत होतं. मी पूर्णपणे मागे हटलो होतो. पुन्हा त्या वेदना अनुभवायच्या नव्हत्या. पण शेवटी त्यातून बाहेर पडणं, पुन्हा प्रेमावर विश्वास ठेवणं आवश्यक होतं.” सलमानसोबतच्या वादाबाबत विवेक म्हणाला, “त्या वेळी ती समस्या खूप मोठी वाटत होती, पण आता मागे वळून पाहिलं की, देवासाठी ती एक छोटीशी गोष्ट होती. त्या काळातली कटुता, भीती आणि वेदना आता मागे सोडल्या आहेत.” त्याने पुढे सांगितलं, “या प्रवासातली सर्वांत कठीण गोष्ट म्हणजे आईच्या डोळ्यातले अश्रू आणि वडिलांच्या चेहऱ्यावरची चिंता पाहणं. त्यामुळे स्वतःला सावरून पुन्हा उभं राहणं महत्त्वाचं होतं. नकारात्मक भावनांमध्ये अडकून राहिलो असतो, तर माझी ऊर्जा संपली असती.” विवेक सध्या वेबसीरीज आणि OTT प्रकल्पांमध्ये व्यस्त आहे. वैयक्तिक जीवनातील कठीण प्रसंगांनंतर तो आता आयुष्यात पुढे गेला आहे आणि नव्या उमेदीने काम करत आहे.

read also:https://ajinkyabharat.com/mohsin-naqevinchi-khurchi-janar/