Sonam Wangchuk Arrested : लेह हिंसा प्रकरणात सरकारची कारवाई

सोनम वांगचुक यांना NSA अंतर्गत अटक

Sonam Wangchuk Arrested : लेह हिंसा प्रकरणात सरकारची कारवाई, NSA अंतर्गत अटक

लडाखमधील अलीकडील हिंसाचारानंतर सामाजिक आणि पर्यावरण कार्यकर्ता सोनम वांगचुक यांना शुक्रवारी पोलिसांनी अटक केली. केंद्र सरकारने त्यांच्यावर आंदोलनकर्त्यांना भडकवल्याचा आरोप ठेवत राष्ट्रीय सुरक्षा कायदा (NSA) अंतर्गत कारवाई केली आहे. वांगचुक यांना दुपारी 2.30 वाजता होणाऱ्या पत्रकार परिषदेला उपस्थित राहण्यापूर्वीच लेह पोलिसांनी ताब्यात घेतले. या घडामोडीनंतर लडाखमधील सुरू असलेल्या आंदोलनांवर आणखी सावट दाटले आहे.

 NGO चा FCRA परवाना रद्द

वांगचुक यांच्या SECMOL (Students’ Educational and Cultural Movement of Ladakh) या संस्थेचा FCRA परवाना गुरुवारी गृहमंत्रालयाने रद्द केला होता. या निर्णयामुळे वांगचुक आणि त्यांच्या समर्थकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.

 ‘बलि का बकरा बनवले जात आहे’ – वांगचुक

अटकेपूर्वीच वांगचुक यांनी केंद्राच्या कारवाईवर टीका केली होती. त्यांनी म्हटले होते –“लडाखमधील हिंसक आंदोलनांसाठी मला जबाबदार ठरवणे म्हणजे मूळ समस्येकडे दुर्लक्ष करून बलि का बकरा शोधण्यासारखे आहे. यामुळे कोणताही तोडगा निघणार नाही.”त्यांनी पुढे सांगितले की, “सरकार मला कठोर कायद्यांतर्गत (PSA किंवा NSA) अटक करण्याची तयारी करत आहे. मी त्यासाठी तयार आहे, पण मला तुरुंगात टाकल्याने परिस्थिती आणखी बिघडेल. आज देशाला ‘चतुराई’ नव्हे, तर ‘बुद्धिमत्ता’ लागेल, कारण तरुण आधीच निराश झालेले आहेत.”

 आंदोलनांना नवी ठिणगी?

वांगचुक यांच्या अटकेमुळे लेह आणि संपूर्ण लडाखमध्ये आधीच सुरू असलेल्या आंदोलनांना नवी ठिणगी मिळण्याची शक्यता आहे. स्थानिक संघटनांनी या कारवाईचा निषेध नोंदवला असून पुढील काही दिवसांत परिस्थिती अधिक चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.लडाखमधील वाढत्या तणावपूर्ण परिस्थितीवर आता देशाचे लक्ष केंद्रीत झाले असून, पुढील हालचालींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

read also : https://ajinkyabharat.com/world-war-3/