सोलापूर : शहरात सामूहिक अत्याचाराच्या तक्रारीमुळे निर्माण झालेली खळबळ अखेर धक्कादायक वळणावर येऊन थांबली आहे. पोलिसांच्या सखोल तपासात संबंधित तरुणीनेच प्रियकराला वाचवण्यासाठी खोटी तक्रार दिल्याचे उघड झाल्याने संपूर्ण प्रकरणात नाट्यमय कलाटणी आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तरुणीसह तिच्या प्रियकरालाही अटक केली आहे.
विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत 18 मार्च 2026 रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास एका 25 वर्षीय तरुणीने डायल 112 वर फोन करून आपल्यावर चार जणांनी सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती दिली होती. या फोननंतर सोलापूर पोलिसांनी तत्काळ हालचाल करत घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तपास सुरू केला. फिर्यादीच्या तक्रारीनुसार चार संशयितांना ताब्यात घेण्यात आले होते.
या घटनेची नोंद होताच पोलीस यंत्रणा पूर्ण क्षमतेने कामाला लागली. वरिष्ठ अधिकारी, गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलीस यांचा समन्वय साधत तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली. मात्र, तपास जसजसा पुढे सरकत गेला, तसतशा या प्रकरणातील अनेक विसंगती समोर येऊ लागल्या.
Related News
पोलिसांनी घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेज तपासले, मोबाईल कॉल डिटेल्स (CDR)ची पाहणी केली आणि तरुणीची वैद्यकीय तपासणीही केली. याशिवाय तिच्या मैत्रिणी आणि बहिणीची चौकशी करण्यात आली. या सर्व तपास प्रक्रियेत बलात्काराची कोणतीही घटना घडल्याचे पुरावे समोर आले नाहीत. उलट, तक्रारीतील अनेक बाबी संशयास्पद असल्याचे स्पष्ट झाले.
अखेर पोलिसांनी चौकशीचा जोर वाढवताच संबंधित तरुणीने संपूर्ण प्रकार हा बनाव असल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश झाला.
पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की, संबंधित तरुणीने आपल्या प्रियकराला एका जुन्या गुन्ह्यातून वाचवण्यासाठी हा खोटा प्रकार रचला होता. तसेच, त्या जुन्या प्रकरणातील फिर्यादी आणि साक्षीदारांवर दबाव आणण्यासाठी सामूहिक अत्याचाराची खोटी कथा तयार करण्यात आली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, तरुणीच्या प्रियकराविरुद्ध 22 डिसेंबर 2023 रोजी गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर तो काही काळ न्यायालयीन कोठडीत होता. पुढे 2025 मध्ये त्याला उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचकडून जामीन मिळाला होता. मात्र, त्या प्रकरणातील फिर्यादीने सर्वोच्च न्यायालयात अपील केल्याने प्रकरण पुन्हा गुंतागुंतीचे झाले होते. याच पार्श्वभूमीवर या दोघांनी साक्षीदारांवर दबाव टाकण्यासाठी खोटा गुन्हा रचल्याचे पोलिस तपासात उघड झाले.
या प्रकरणात विजापूर नाका पोलीस ठाण्यात तरुणी आणि तिच्या प्रियकराविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 248, 217 आणि 61(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांनाही अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
या घटनेमुळे पोलिस प्रशासनासमोर खोट्या तक्रारींचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. अशा प्रकारच्या बनावट तक्रारींमुळे खऱ्या गुन्ह्यांच्या तपासावर परिणाम होतो, तसेच निरपराध व्यक्तींनाही त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे अशा प्रकरणांवर कठोर कारवाई करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.
दरम्यान, या घटनेमुळे सोलापूर शहरात मोठी चर्चा रंगली असून नागरिकांमध्ये आश्चर्य आणि संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी नागरिकांना कोणतीही तक्रार करताना सत्य माहिती देण्याचे आवाहन केले आहे.
