मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांची चाहूल लागताच राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. छोट्या-छोट्या मुद्द्यांवरूनही नेत्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे हे सध्या सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत.
दादर येथे देशपांडे यांनी काही महिन्यांपूर्वी ‘इंदुरी चाट आणि बरंच काही…’ या नावाने उपहारगृह सुरू केले. हे उपहारगृह मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानाजवळ आहे. मात्र या हॉटेलमधील कुक परप्रांतीय असल्याचा मुद्दा भाजप कार्यकर्त्यांनी पकडला असून, यावरून देशपांडे यांना सोशल मीडियावर जोरदार ट्रोल करण्यात येत आहे.
मनसे नेते संदीप देशपांडे नेहमी मराठी भाषा, स्थानिकांना नोकरीत प्राधान्य आणि भूमिपुत्रांचा हक्क या मुद्यांवर आक्रमक भूमिका घेतात. अलीकडील काही महिन्यांत मनसेने मराठी भाषेवरून भाजपची अनेकदा कोंडी केली होती. आता त्याच मुद्द्यावर भाजप कार्यकर्त्यांनी त्यांना त्यांच्या हॉटेलवरूनच कोपऱ्यात पकडल्याचं दिसत आहे.
यात भर म्हणून, नुकतेच प्रसिद्ध शेफ शिप्रा खन्ना आणि रश्मी उदयसिंग यांनी देशपांडेंच्या उपहारगृहाला भेट दिली. त्याचा फोटो देशपांडे यांनी स्वतः सोशल मीडियावर पोस्ट केला. या पोस्टनंतर भाजप समर्थकांनी त्यांना लक्ष्य करत –
“हॉटेलचा कूक परप्रांतीय, पदार्थ परप्रांतीय, प्रमोशन परप्रांतीय… स्वतःच्या हॉटेलमध्ये मराठी आचारी बसवता येत नाही, आणि ते मराठी महापौर करण्याच्या गप्पा मारतात” – अशा शब्दांत टीका केली.
एका युजरने तर राज ठाकरे आणि संदीप देशपांडे यांचा फोटो टाकत “हमारे संदीप भय्या के दुकान मे अनेका हा” असं वाक्य लिहून त्यांची खिल्ली उडवली.
read also :https://ajinkyabharat.com/fickle-pitambara-wale-yanche-call/
