सर्रासपणे बसविले जात असलेल्या स्मार्ट मिटर ला विरोध विद्युत ग्राहक अन्याय निवारण मंच चा आंदोलनाचा इशारा
अडगाव बु..वार्ताहर … स्मार्ट मिटर च्या नावाखाली कंत्राटदाराच्या माणसांकडून सर्रासपणे मिटर लावण्याचा सपाटा अडगाव
बु 33 केव्ही उपकेंद्रांतर्गत सुरु असल्याने विद्युत ग्राहकांमध्ये असंतोषाचे वातावरण पसरले आहे.
त्यामुळे विद्युत ग्राहक अन्याय निवारण मंचच्या वतीने सक्त विरोध दर्शवून आंदोलनाचा इशारा दिला आहे.
मुंबईच्या जीनस इन्फ्रा पॉवर कंपनी च्या वतीने ठरलेल्या पॉलिसी ला गुंडाळून ठेवत अडगाव बु 33 केव्ही उपकेंद्रांतर्गत च्या 14 गावात साडे
अकराशे पेक्षा जास्त स्मार्ट मिटर लावण्यात आले आहेत . व्यवस्थीत पणे सुरू असलेले मिटर काढून त्या ठिकाणी सर्रासपणे स्मार्ट मिटर लावण्याचे
काम जीनस कंपनी चे लोक बिनधास्तपणे करत असून याला विद्युत विभागाचा छुपा पाठिंबा असल्याने कंपनीची मनमानी चालू असल्याची बाब ग्राहकांनी कथन केली आहे.
यामुळे विद्युत ग्राहकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे .
याबाबत विद्युत ग्राहक अन्याय निवारण मंचच्या वतीने स्मार्ट मिटर ला नकार ची भुमिका घेऊन कार्यकारी अभियंता अनिल उइके याची भेट घेऊन सक्तीने बसविल्या जात
असलेल्या स्मार्ट मिटर बाबत तक्रार केली असता सर्व सामान्य ग्राहकांकडे स्मार्ट मिटर लावल्या जाणार नाही यात फक्त शासकीय कार्यालये,
नवीन विद्युत कनेक्शन, सौर ऊर्जा युनिट बसविलेल्या ठिकाणी व दोषपूर्ण मिटर (फॉल्टी) असलेल्या ठिकाणी च स्मार्ट मिटर लावले जातील ही बाब स्पष्ट केली.
हिच पॉलिसी ठरलेली असल्याचे मत व्यक्त करुन कुठेही स्मार्ट मिटर साठी सक्ती केली जाणार नाही असेही सांगितले.
संपलेल्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुध्दा सर्व सामान्य ग्राहकांना कुठेही स्मार्ट मिटर लावल्या जाणार नाहीत
असे सभागृहात सांगितले एवढे सर्व स्पष्ट असताना जीनस इन्फ्रा पॉवर कंपनी च्या वतीने ज्या ज्या ठिकाणचे व्यवस्थित पणे सुरु असलेले मीटर काढलेले असतील
ती चुकीच्या पद्धतीने लावलेली सर्व स्मार्ट मिटर काढून त्या ठिकाणी जूने मिटर त्वरित पूर्ववत लावण्या बाबत त्यांना आदेश द्यावेत .
विद्युत विभागाकडून स्मार्ट मिटर च्या कंत्राटदाराला त्यांनी ठरलेल्या पॉलिसी शिवाय कुठेही चुकीच्या पद्धतीने स्मार्ट मिटर बसवू नये
अशी स्पष्ट ताकीद द्यावी अन्यथा कंत्राटदारावर कारवाई केल्या जाईल याची त्यांना जाणीव करून द्यावी अशी मागणी विद्युत ग्राहक अन्याय निवारण मंचच्या वतीने दिलेल्या निवेदनातून केली आहे.
ठरलेल्या पॉलिसी शिवाय चुकीच्या पद्धतीने लावलेले सर्व स्मार्ट मिटर त्वरित न काढल्यास विद्युत ग्राहक अन्याय निवारण मंचच्या वतीने विद्युत
कार्यालयासमोर आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा विद्युत ग्राहक अन्याय निवारण मंचच्या वतीने सरपंच अशोक घाटे,
माजी जि प सदस्य मनमोहन व्यास, माजी सभापती गोपाल कोल्हे, पत्रकार माणिक घाटे,तंटामुक्ती अध्यक्ष शहिदखॉ पठाण,
उपसरपंच गुलाम आरीफ,अजय धाके, राहुल घोडेस्वार यांनी कनिष्ठ अभियंता प्रशांत पाटील यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
कुठेही सर्व सामान्य ग्राहकांकडे स्मार्ट मिटर लावल्या जाणार नाहीत फक्त नवीन विद्युत कनेक्शन,
सौर ऊर्जा युनिट बसविलेल्या ठिकाणी, शासकीय कार्यालये व दोषपूर्ण मिटर असेल तीथेच स्मार्ट मिटर लावल्या जातील याशिवाय चुकीचे ठिकाणी सर्रासपणे
स्मार्ट मिटर लावले असतील त्याची चौकशी करून योग्य ती कार्यवाही केली जाईल.
अनिल उइके कार्यकारी अभियंता (ग्रामीण) अकोट