इम्रान खान यांच्यासाठी बहिणींची लढाई: उज्मा, रुबीना, अलीमा आणि राणी यांची कहाणी

इम्रान खान

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (PTI) पक्षाचे संस्थापक इम्रान खान सध्या कारागृहात असून त्यांच्या सुटकेसाठी देशभर राजकीय व सामाजिक आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात सर्वांत आघाडीवर उभ्या राहिल्या आहेत इम्रान खान यांच्या चार बहिणी – उज्मा खान, रुबीना खान, अलीमा खान आणि राणी खान (नौरीन). भावासाठी त्यांनी रस्त्यावर उतरून, न्यायालयात धाव घेऊन आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आवाज उठवत अक्षरशः “जीवाचं रान” केल्याचं सध्या पाकिस्तानमध्ये चर्चेचा विषय ठरलं आहे.

अदयाला जेलमध्ये इम्रान खान यांची भेट घेणाऱ्या उज्मा खान यांनी मंगळवारी बाहेर येताना महत्त्वपूर्ण माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, इम्रान यांची तब्येत स्थिर आहे, मात्र ते अत्यंत संतप्त आहेत. त्यांच्यावर तुरुंगात मानसिक दबाव टाकला जात असून हा छळ लष्करप्रमुख आसिम मुनीर यांच्या पातळीवरून होत असल्याचा आरोप इम्रान यांनी केल्याचं उज्मा यांनी सांगितलं. अनेक आठवडे कुटुंबीयांना भेटीस रोखण्यात आलं होतं. याच काळात इम्रान यांच्या मृत्यूच्या अफवा पसरू लागल्या आणि त्यामुळे त्यांच्या बहिणींनी अदयाला जेल व इस्लामाबाद हायकोर्टबाहेर सातत्याने आंदोलन छेडलं. अखेर सरकारला माघार घ्यावी लागली आणि उज्मांना भेटीची परवानगी देण्यात आली.

उज्मा खान – डॉक्टर बहिण, आघाडीची आंदोलक

Related News

उज्मा खान नियाजी पेशाने डॉक्टर व सर्जन असून लाहोर येथे वास्तव्यास आहेत. त्या आणि त्यांचे पती मजीद खान मौलवी इम्रान यांचे कट्टर समर्थक आहेत आणि पक्षाच्या कार्यक्रमांना सातत्याने हजेरी लावतात. मजीद खान हे पाकिस्तानी एअरफोर्समध्ये विंग कमांडर पदावरून निवृत्त झाले असून त्यांनी अमेरिकन F-16 फायटर जेट उडवणाऱ्या पहिल्या पाकिस्तानी पायलट्सच्या बॅचमध्ये सहभाग घेतला होता. एका मुलाखतीत मजीद यांनी सरकारवर कठोर टीका करत “शत्रूसोबतसुद्धा अशी वागणूक दिली जात नसेल, जशी इम्रानसोबत दिली जात आहे,” असं म्हटलं होतं. दरम्यान, उज्मा व मजीद यांच्यावर कथित कोट्यवधींच्या जमीन खरेदी घोटाळ्याचे आरोप असून त्याबाबत पाकिस्तानी न्यायालयात खटले सुरू आहेत.

रुबीना खान – शांत स्वभावाची संयुक्त राष्ट्रातील अधिकारी

इम्रान यांची सर्वांत मोठी बहिण रुबीना खान यांचा जन्म १९५० मध्ये लाहोर येथे झाला. त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून शिक्षण घेतलं आणि संयुक्त राष्ट्रसंघात वरिष्ठ पदावर अनेक वर्षे सेवा दिली. त्यांनी विवाह केला नाही. नोकरीमुळे त्यांचे अनेक वर्षे अमेरिकेत वास्तव्य राहिलं. स्वभावाने अत्यंत शांत, संयमी आणि राजकारणापासून कायम दूर राहणाऱ्या रुबीना थेट आंदोलनात दिसत नसल्या, तरी भावामागे उभ्या राहिलेल्या कुटुंबाचा एक महत्त्वाचा आधार म्हणून त्यांना पाहिलं जातं.

अलीमा खान – टेक्स्टाईल उद्योजिका आणि सामाजिक कार्यकर्त्या

तिसरी बहिण अलीमा खान या पाकिस्तानमधील प्रसिद्ध टेक्स्टाईल निर्यातदार आहेत. १९६० साली जन्मलेल्या अलीमा यांनी लाहोरमध्ये शिक्षण घेतल्यानंतर फॅशन डिझाइनिंग आणि टेक्स्टाईल क्षेत्रात प्राविण्य मिळवलं. १९८९ मध्ये लाहोर युनिव्हर्सिटी ऑफ मॅनेजमेंट सायन्समधून एमबीएची पदवी घेतल्यानंतर त्यांनी “कोटकॉम सोर्सिंग प्रायव्हेट लिमिटेड” ही कंपनी स्थापन केली. आज अनेक देशांना गारमेंट निर्यात करणाऱ्या पाकिस्तानातील आघाडीच्या उद्योजिकांमध्ये त्यांचा समावेश आहे. महिला सशक्तीकरणासाठी त्या खुल्या विचारांनी आवाज उठवतात. शौकत खानम कर्करोग रुग्णालयासाठी निधी संकलनाचं महत्त्वाचं काम त्या सातत्याने करतात. इम्रान यांच्या राजकीय प्रवासात अलीमाचा मोठा वाटा असल्याचं मानलं जातं. त्यांच्या पती सुहैल अमीर खान बर्की हे पाकिस्तान एअरफोर्सचे माजी अधिकारी आहेत.

नौरीन उर्फ राणी खान – कुटुंब आणि राजकारणात अडकलेली बहिण

इम्रान यांची सर्वात छोटी बहिण नौरीन खान, ज्यांना राणी खान म्हणून ओळखलं जातं, यांचा विवाह त्यांच्या चुलतभावाशी – हफीजुल्ला खान नियाजी यांच्याशी झाला. लग्नानंतर त्या काही काळ अमेरिकेत राहिल्या, नंतर जेद्दामध्ये स्थायिक झाल्या. हफीजुल्ला पेशाने इंजिनियर असून ते पीटीआयचे संस्थापक सदस्य होते. मात्र कालांतराने इम्रान यांच्याशी त्यांचे मतभेद झाले. २००२ मध्ये मियांवली मतदारसंघातून त्यांनी इम्रान यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती, परंतु त्यांना पराभव पत्करावा लागला. सध्या हफीजुल्ला पत्नी-मुलांपासून वेगळे राहतात अशी माहिती आहे.

भावासाठी चार बहिणींचा संघर्ष

आज इम्रान खान तुरुंगात असताना, त्यांच्या बहिणी वेगवेगळ्या पातळ्यांवर लढा देत आहेत – कोणी रस्त्यावर उतरून आंदोलन करतंय, कोणी न्यायालयीन लढा लढतंय, कोणी आंतरराष्ट्रीय पातळीवर आवाज उठवतंय तर कोणी आर्थिक-सामाजिक पाठबळ निर्माण करतंय. या चार बहिणींची एकजूट आणि धाडसामुळेच इम्रान खान यांच्या लढ्याला नवं बल मिळालं आहे. पाकिस्तानच्या राजकीय रणांगणात भावासाठी उभ्या राहिलेल्या या बहिणी आज संघर्षाचं, भावनिक नात्याचं आणि जिद्दीचं प्रतीक ठरत आहेत.

read also : https://ajinkyabharat.com/shocking-type-of-computer-drivers-confession-revealed-in-wadegaon/

Related News