सर्पदंशाने ५५ वर्षीय महिलेचा मृत्यू; पावसामुळे उपचारात विलंब, वन्यजीवही त्रस्त

सर्पदंशाने ५५ वर्षीय महिलेचा मृत्यू; पावसामुळे उपचारात विलंब, वन्यजीवही त्रस्त

प्रतिनिधी | लोणार | २२ जुलै २०२५

तालुक्यातील पहूर गावात घडलेल्या दुर्दैवी घटनेत सर्पदंशामुळे ५५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.

सिंधुताई शंकर मुंढे असे मृत महिलेचे नाव असून, त्यांच्या अंथरुणात शिरलेल्या भारतीय कोब्रा या अत्यंत विषारी सापाच्या दंशामुळे त्यांचे निधन झाले.

रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. पावसामुळे थंड हवामानात निवारा शोधण्यासाठी साप घरात शिरला असावा,

असा अंदाज व्यक्त होत आहे. सिंधुताई मुंढे झोपेत असताना त्यांच्या अंथरुणात असलेल्या नागाने त्यांना चावा घेतला.

कुटुंबीयांनी तातडीने त्यांना उपचारासाठी मेहकर येथे नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पावसामुळे नदीला आलेल्या पुरामुळे रस्ते पूर्णतः बंद होते.

त्यामुळे वेळेवर वैद्यकीय मदत मिळू शकली नाही. वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.

पावसामुळे वन्यजीवही त्रस्त

या घटनेच्या निमित्ताने पावसाळ्यात वन्यजीवांच्या अडचणींवरही प्रकाश पडतो.

घरामध्ये साप, पाली, बेडूक, घुबड यांचा शिरकाव लक्षणीय प्रमाणात वाढतो.

प्राणीमित्र प्रा. विनय कुलकर्णी यांनी माहिती दिली की, गेल्या काही दिवसांत पावसात अडकलेल्या आणि जखमी

अवस्थेतील श्रृंगी घुबड (Rock Eagle Owl), कोकिळेचे पिल्लू, तसेच नाग आणि दिवड यांचे यशस्वी रेस्क्यू करण्यात आले आहेत.

त्यांनी त्यांना योग्य उपचार देऊन पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडले.

सावधगिरीचे आवाहन

प्रा. कुलकर्णी यांनी नागरिकांना घरात झोपताना दरवाजे बंद ठेवणे, फटी-बीळा बुजवणे,

आणि मच्छरदानीचा वापर करणे यासारख्या उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे.

आपत्कालीन व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

या घटनेमुळे पुन्हा एकदा ग्रामीण भागातील आपत्कालीन वैद्यकीय व्यवस्थेतील उणिवा समोर आल्या आहेत.

पावसाळ्यात रस्ते खचणे, पूर येणे, वाहतुकीचा अभाव यामुळे वैद्यकीय मदत वेळेत मिळत नाही.

त्यामुळे सरकारने मोबाईल मेडिकल युनिट, जलद प्रतिसाद पथक, अशा उपाययोजनांवर गांभीर्याने विचार करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

सिंधुताई मुंढे यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

या दुर्दैवी घटनेने सर्वांना सावधगिरीचा इशारा दिला आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/worker-minister-akash-fundkar-yannanya-attended-75-gentlemen-blood-donation/